भाजपमध्ये कुणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत – चंद्रकांत बावनकुळे

भाजपमध्ये कुणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत – चंद्रकांत बावनकुळे

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नारज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ते भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता चंद्रकांत बावनकुळे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. भाजपमध्ये कुणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं वक्तव्य चंद्रकांत बावनकुळे यांनी केलंय. त्यामुळे अजित पवारांच्या भाजप पक्ष प्रवेशावरील चर्चा आणखी गडद होताना चित्र दिसून येत आहे.

राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दुसरीकडे चंद्रकांत बावनकुळे यांनी तातडीचा दिल्ली दौरा केलाय. त्यापाठोपाठ आशिष शेलारही दिल्ली दौऱ्यावर येणार असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता चंद्रकांत बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

चंद्रकांत बावनकुळे हे दिल्ली आल्यानंतर माध्यमांनी त्यांच्या तातडीच्या दौऱ्याबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी उत्तर देताना चंद्रकांत बावनकुळे यांनी आपण एका प्रशासकीय कामाच्या निमित्ताने दिल्ली दौऱ्यावर आलो असल्याचं सांगितंल. “देशाचे उर्जामंत्री आर.के. सिंग यांच्याकडे नागपुरमधल्या एनटीपीसी प्रकल्पासंदर्भात काही प्रश्नांसाठी दिल्लीला आलो आहे. आशिष मुंबई-दिल्ली आणि दिल्ली ते बंगळुर असा प्रवास करणार आहेत. दिल्लीत येण्यामागे कुठलंही राजकीय कारण नाही. अमित शहांना भेटायला गेलो तर राजकीय कारण असतं असं नाही.” असं देखील यावेळी चंद्रकांत बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ३५-४० आमदारांसह भाजपासोबत सत्तास्थापनासाठी सज्ज झाल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात उत आला आहे. यावर प्रश्न केले असता चंद्रकांत बावनकुळे अजित पवारांबद्दल काही माहिती नसल्याचं सांगून यावर बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. “अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. भाजपमध्ये कुणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. भाजप पक्षात कुणीही आलं तरी त्याचा प्रवेश होईल.”, असं विधान यावेळी चंद्रकांत बावनकुळे यांनी केलंय.

तसंच येणारा संपूर्ण महिना हा पक्षप्रवेशा असणार, असं सूचक विधानही यावेळी त्यांनी केलं. प्रत्येक बुथवर २५ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्याचा संकल्प केलाय. ३० एप्रिलच्या मन की बातपर्यंत २५ लाख पक्षप्रवेश होणार आहेत. महाराष्ट्रभर सर्व बुथवर आमचं लक्ष आहे. जवळपास १ लाख बुथवर कार्यकर्ते काम करत आहेत. राज्यातले ७०० पदाधिकारी प्रत्येक बुथवर जात आहेत. मोठ्या पक्षप्रवेशावर मी बोलणार नाही, पण बुथवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षातून पक्षप्रवेश करतोय.”, असं देखील चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितलंय. तसंच विचारधारा पटली तर पक्षात कुणाचंही स्वागत करू, असं देखील चंद्रकांत बावनकुळे म्हणाले.

खारघरमधील श्री सदस्यांचा उष्माघामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणावर देखील चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. “विरोधकांना यावर राजकारण करायचं आहे. खारघरमधील घटना दुर्दैवी आहे. हे कुणामुळे झालं हे महत्त्वाचं नाही. जे मृत झालेत त्यांच्या कुटुंबियांना काय मदत करता येईल, हे महत्त्वाचं आहे.”, असं देखील यावेळी चंद्रकांत बावनुकळे म्हणाले.

First Published on: April 17, 2023 12:55 PM
Exit mobile version