‘आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार, पण…’

‘आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार, पण…’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपामध्ये बिनसलं आणि शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केलं. मात्र महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरु असतानाच आता राज्याच्या हितासाठी शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली असून, दस्तुरखुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत’, असे चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे भाजपा (BJP) आता बॅकफुटवर गेली की काय? अशी चर्चा मात्र राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पण निवडणुका एकत्र लढणार नाही!

मात्र, यामध्ये एक अट चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी घातली आहे. ‘राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र तयार आहोत पण एकत्र आल्यावर निवडणुका मात्र एकत्र लढणार नसल्याचे’ चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. ‘राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही शिवसेनेसोबत आजही एकत्र यायला तयार आहोत. राज्याच्या हितासाठी केंद्रीय नेतृत्वाने काही फॉर्म्युला केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तो फॉर्म्युला मान्य झाला आणि केंद्राने आम्हाला या फॉर्म्युल्याचे पालन करण्याचे आदेश दिले तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ. आम्हाला केंद्राचे आदेश पाळावेच लागतात’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेना सध्या हवेत…

शिवसेना (Shivsena) सध्या हवेत असून ते एकत्र यायला तयार होतील असे वाटत नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणालेत. ‘भविष्यात आम्ही एकत्र आलोच तर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेईल’, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी ‘आम्ही एकत्रित निवडणुका लढणार नाही. एकत्रित निवडणुका (Elections) लढवायच्या आणि सोयीचे राजकारण करायचे हे राजकारण योग्य नाही’ असे म्हणत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

First Published on: July 28, 2020 12:24 PM
Exit mobile version