युतीमध्ये गोडवा आणण्यासाठी भाजपची तिळगुळ डिप्लोमसी

युतीमध्ये गोडवा आणण्यासाठी भाजपची तिळगुळ डिप्लोमसी

चंद्रकांत पाटील म्हणतायत तिळगुळ घ्या... गोड, गोड बोला

भाजप आणि शिवसेना यांच्यातील नाते आता महाराष्ट्राला नवे राहिलेले नाही. सत्तेत सहभागी असूनही दोन्ही पक्ष एकमेकांना नामोहरण करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज संक्रातीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना तिळगुळ देत कॅबिनेटच्या बैठकीत गोड गोड बोलण्याचा सल्ला दिला. एवढेच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेटच्या बैठकीत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तिळगुळ वाटले असल्याचे खुद्द रामदास कदम यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

पुढील काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युती व्हावी, यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शिवसेनेबरोबर कोणताही वाद नको, अशीच भूमिका भाजपच्या वरिष्ठांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच मकरसंक्रातीचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारमधील नंबर दोनचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी तिळगुळ देत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आता गोड गोड बोलावे, अशीच भावना व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

हे वाचा – मकरसंक्रांत : पतंगामुळे ३०० जण जखमी 

आता हा तिळगुळाचा गोडवा फक्त मकरसंक्रांतीपुरता मर्यादित राहतो की पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकतो, हे जाणून घेण्यासाठी मात्र आपल्याला वाट पाहावी लागेल.

 


हे देखील वाचा – ‘सीएमओ महाराष्ट्र’ फेसबुक पेजवर शेतकर्‍यांकडून ‘सरकारचा पंचनामा’

First Published on: January 15, 2019 2:17 PM
Exit mobile version