Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवर शेतकर्‍यांकडून 'सरकारचा पंचनामा'

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवर शेतकर्‍यांकडून ‘सरकारचा पंचनामा’

Subscribe

सरकारच्या लोकसंवाद कार्यक्रमातील निवडक शेतकर्‍यांच्या ‘गोड’ प्रतिक्रिया सुरु असताना त्याच वेळी ‘सीएमओ महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवर शासन आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा अक्षरश: पंचनामाच करण्यात आला. ‘खोटारडे मुख्यमंत्री’, ‘बोलबच्चन’ 'सरकार बदला, शेतकर्‍यांची दशा बदलेल यासह हजारो कॉमेंटचा पाऊस सीएमओ पेजवर पडला.

साहेब तुमच्यासारखं मायबाप सरकार नाही… तुमच्या योजनांनी आमचं आयुष्य बदलून टाकलं…कर्जमाफी मिळाल्याने कुटूंब खूश आहे… सरकारच्या लोकसंवाद या कार्यक्रमातील या निवडक शेतकर्‍यांच्या ‘गोड’ प्रतिक्रिया.. तर याच वेळी ‘मुख्यमंत्र्यांच्या’ फेसबुक पेजवर शासन आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा अक्षरश: पंचनामाच करण्यात आला. ज्या राज्याला स्वतंत्र कृषीमंत्री नाही ते शेतकर्‍यांचे काय भलं करणार? शेतकर्‍यांच्या खात्यात १५ लाख रुपये कधी पडतील? शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी अजून किती वेळ वाट बघावी लागणार? यासह हजारो कॉमेंटचा पाऊस मुख्यमंत्र्यांच्या पेजवर पडला.

इतकेच नाही तर याच कार्यक्रमावेळी ‘फेकू नंबर वन मुख्यमंत्री’ अशा उपाध्याही कॉमेंट बॉक्समध्ये ‘बहाल’ करण्यात आल्या. त्यामुळे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने ‘आ बैल मुझे मार’ या उक्तीप्रमाणे ठरल्याचे स्पष्ट झाले. अर्थात यातील काही कॉमेंट राजकीय हेतूने प्रेरीत अशा होत्या हे लपून राहिले नाही. भाजप सरकारच्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या योजनांबाबत मुख्यमंत्री दर आठवड्याला लोकसंवाद कार्यक्रमातून लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

चांगल्या योजना बंद होतील

- Advertisement -

त्याअंतर्गत सोमवारी (दि. १४) कृषी विषयक योजनांचा आढावा घेण्यात आला. याकरिता गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे बर्‍याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काय प्रश्न विचारायचे आणि भावना कशा मांडायच्या, हे सांगून ठेवण्यात आले होते. शासकीय योजनांविषयी चांगले तेच बोला, अन्यथा मुख्यमंत्रीसाहेब चिडतील. चांगल्या योजना बंद होतील, अशी तंबीही अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिल्याचे काही अधिकार्‍यांनीच दबक्या आवाजात ‘आपलं महानगर’ला सांगितले.

सकाळी ११.४० ला या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मराठवाड्यात दुष्काळी स्थिती चिंताजनक असल्याने मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला मराठवाड्यातील जालना जिल्ह्यापासून संवादाला सुरुवात केली. पालघर, अहमदनगर, परभणी, सोलापूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांतील शेतकर्‍यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याचे सांगत सरकारचे आभार मानले. काही शेतकर्‍यांनी मागण्याही मांडल्या. परंतु हे सर्व शेतकरी ‘तयारी’त बसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सौम्यपणे आपली गार्‍हाणी मांडली. म्हणजे हा संवाद ‘ऐसे कौतुके रसिके’असाच होता. विशेषत: बहुसंख्य शेतकर्‍यांनी शासनाच्या कारभाराचे तोंडभरून कौतुकच केले. हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह सुरू होता. त्यामुळे यावर येणार्‍या लाईव्ह कमेंटवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. याचा फायदा उचलत अनेकांनी कॉमेंट बॉक्समध्ये ‘मन मोकळे’ करून घेतले. भाजप सरकार हे केवळ आश्वासने देणारे असून शेतकर्‍यांच्या विरोधातील आहे, असा सूर यावेळी कॉमेंट करणारे आळवत होते.

सरकार बदला, शेतकर्‍यांची दशा बदलेल

- Advertisement -

‘खोटारडे मुख्यमंत्री’, ‘बोलबच्चन’ पासून सुरू झालेला कॉमेंटचा प्रवास कर्जमाफी कधी मिळणार यावरच अधिकवेळ स्थिरावला. खोटी आकडेवारी जाहीर नका करु… आम्हाला बँका जवळ येऊ देत नाहीत… मी प्रामाणिकपणे कर्ज भरले म्हणून मला कर्जमाफी मिळाली नाही का?.. सरकार बदला, शेतकर्‍यांची दशा बदलेल.. मुद्रा लोन मिळतच नाही…एखादा लोकसंवाद बेरोजगारांचा घ्या…या आणि अशा असंख्य कॉमेंट्स यावेळी सीएमओ पेजवर देण्यात आल्यात.

आत्महत्येचाही इशारा

साहेब तुम्ही आमची फसवणूक केली. मी आपल्या जाचाला कंटाळलोय. आता मी आत्महत्या करणार, असा इशाराच दिला.

नाशिकच्या शेतकर्‍यांकडे पाठ

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, देवळा, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, निफाड, येवला तालुक्यातून १७ शेतकरी या लोकसंवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. नाशिकमध्येही दुष्काळी परिस्थिती असून कांद्याला भाव नाही. याबाबत शासनाकडून हस्तक्षेप करण्याची अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र नाशिकशी संवाद टाळल्याची भावना लाभार्थी शेतकर्‍यांनी व्यक्त केली. सुमारे दोन तास चाललेल्या या संवाद कार्यक्रमात नाशिकच्या शेतकर्‍यांकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांचा हिरमोड झाला.

नाशिकला फुडपार्क

फळ, फळावळ ही नाशवंत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. याकरिता शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. यावर फळप्रक्रिया उद्योगांसाठी नाशिक येथे एम.आर. कंपनीच्या माध्यमातून फुडपार्क विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता कंपनीने सर्वेक्षणही केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


वाचा – शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांची मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाचा – चीनने पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री


 

- Advertisment -