‘महाराष्ट्र केसरी’ बक्षिसाच्या रकमेत फसवणूक?

‘महाराष्ट्र केसरी’ बक्षिसाच्या रकमेत फसवणूक?

महाराष्ट्र केसरी

बालेवाडी (पुणे) येथील छत्रपती शिवाजी संकुलात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने मानाची गदा पटकावली. मात्र, गदेसोबतच स्पर्धेआधी बक्षिसाची जी रक्कम ठरली होती, ती राज्य कुस्तीगीर परिषदेने दिलेली नाही, असा आरोप हर्षवर्धनचे प्रशिक्षक काका पवार यांनी केला आहे. या स्पर्धेतील विजेत्यासाठी दीड लाख, तर उपविजेत्यासाठी ७५ हजार इतके बक्षीस जाहीर करण्यात आले होते; पण प्रत्यक्षात विजेत्यास केवळ २० हजार आणि उपविजेत्याला १० हजारांची रक्कम देण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा काका पवार यांनी केला आहे.

राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा यांच्यातर्फे ‘महाराष्ट्र केसरी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेआधी सर्व गटातील विजेत्यांना अमनोरातर्फे रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात विजेत्यांना अत्यंत तोकडी रक्कम देण्यात आल्याचा प्रशिक्षक काका पवारांचा आरोप आहे. पवार यांच्या सांगण्यानुसार, महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला दीड लाख रुपयांचे, तर उपविजेत्यास ७५ हजारांचे पारितोषिक दिले जाते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत विजेत्या खेळाडूंना देण्यात येणार्‍या रकमेबाबत ठरले होते, मात्र प्रत्यक्षात हर्षवर्धनला केवळ २० हजार रुपये देण्यात आले आहे. त्यामुळे या मानाच्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना मिळणार्‍या पुरस्काराबद्दलचा घोळ अद्यापही कायम असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगत आहे.

कुस्तीगीर परिषदेच्या म्हणण्यानुसार…
बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च यंदा पुण्यातील ‘अमनोरा’ने उचलला होता. ज्यात प्रत्येक वजनी गटातील सुवर्णपदक विजेत्यास २० हजार, रौप्यपदक विजेत्यास १० हजार व कांस्य पदक विजेत्यास ५ हजार रोख बक्षीस देण्याचे ठरले. त्याप्रमाणे बक्षिसाची रक्कम अदा करण्यात आली. महाराष्ट्र केसरी विजेत्या आणि उपविजेत्या मल्लास या व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त बक्षिसे जाहीर केली गेली नव्हती, तशी अधिकृत घोषणाही केली नव्हती, असे कुस्तीगीर परिषदेचे म्हणणे आहे.

सगळेच अनभिज्ञ कसे?
सद्यस्थितीत गल्ली क्रिकेट वा कुठल्याही स्पर्धांमध्ये किमान २५ ते ५० हजार रुपयांची पारितोषिके दिली जातात. त्याचबरोबर मुंबई, पुण्यासह नाशिक वा अन्य बड्या शहरांत होणार्‍या महापौर चषक तसेच अन्य मानाच्या स्पर्धांमध्ये मोठ-मोठी पारितोषिके दिली जातात. मग, ‘महाराष्ट्र केसरी’सारख्या मानाच्या स्पर्धेच्या पारितोषिकांबाबत सगळेच अनभिज्ञ कसे, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचबरोबर विजेत्या मल्लाला मिळणार्‍या रकमेबाबत अशी अनभिज्ञता का, अशीही चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे. यात खेळाडूंची कुठल्याही प्रकारची फसवणूक होत असल्यास ती कुस्तीसह सर्वच खेळांसाठी मारक ठरणारी बाब असेल, असे मत क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केेले.

…ही नाशिककरांची फसवणूक!
पहिल्यांदाच नाशिकच्या एखाद्या मल्लाने ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब जिंकला आहे. त्यामुळे त्याला बक्षिसाची योग्य व पूर्ण रक्कम मिळायलाच हवी. कुस्तीगीर परिषदेकडून विजेत्यांना योग्य पारितोषिक दिले गेले पाहिजे. खेळाडूंवर कुठल्याही प्रकारचा अन्याय व्हायला नको. महाराष्ट्र केसरीतील विजेत्यास दीड लाखांचे पारितोषिक योग्यच आहे. हर्षवर्धनची फसवणूक होत असेल, तर ही सर्व नाशिककरांचीच फसवणूक म्हणावी लागेल. कुस्तीपटूंसह प्रशिक्षकांनी हर्षवर्धनच्या पाठीशी उभे राहून त्याला न्याय मिळवून द्यायला हवा.
– गोरख बलकवडे, कुस्ती प्रशिक्षक, नाशिक

First Published on: January 10, 2020 5:45 AM
Exit mobile version