कोंबडी १२०,फरसबी ३०० रुपये किलो!

कोंबडी १२०,फरसबी ३०० रुपये किलो!

एकीकडे इंधन दरवाढ आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा संप या कात्रित अडकलेल्या भाज्यांचे दर दोन दिवसानंतर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांच्या संपामुळे भाज्यांची आवक कमालीची रोडावली आहे. तर दोन दिवस झालेल्या पावसाचा फायदा घेत घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळ व्यापाऱ्यांनी भाज्यांच्या दरात मोठी वाढ करून ग्राहकांना बेजार केले आहे. भाजीपेक्षा कोंबडीचे भाव कमी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या संपात सरकारकडून कोणतीही तडजोड होऊ न शकल्याने उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीत कमालीची घट झाली आहे. आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर याआधीच वाढले आहेत. त्यात इंधन दरवाढीचा परिणाम जाणवू लागला. माल वाहतुकीचे दर गगनाला भिडल्याचा परिणाम घाऊक बाजारातील भाजीवर झाला. आता तर पावसाने यात तेल ओतले. यामुळे बाजारातील भाजी न परवडणारी झाली आहे. मुंबईच्या किरकोळ बाजारातील व्यपाऱ्यांनी यात अधिकच तेल ओतले आणि आपले भाव सरासरी शंभर पटीने वाढवल्याची बाजारात फेरी मारल्यावर दिसून येते.

कोंबडीपेक्षा भाज्या महाग

मुंबईत बॉयलर कोंबडीचे दर किलोमागे १२० रुपये तर भाज्यांचे दर सरासरी दीडशे रुपयांहून अधिक असल्याचे दहिसर येथील फारुकभाई मुर्गीवाला यांनी सांगितले. याच विभागात फरसबीचे दर किलोमागे २५० ते ३०० रुपये इतके वर गेले आहेत. भोपळा, मिरची १०० रुपये किलो तर टोमॅटोचे दर टोमॅटो पन्नाशीत गेले आहेत. पालेभाजी असलेल्या मेथीची मोठी जुडी ८० रुपये तर लहान जुडी ५० रुपयांना विकली जात असल्याचे पाहायला मिळाले. कोथंबीर ५० रुपये जुडी, काकडी ५० रुपये किलो, कांदा २५ रूपये किलो, बटाटा २४ रुपये किलोत विकले जात आहे. तर इतर भाज्या १५ ते २५ रुपये पाव किलो या दराने विकल्या जात असल्याची माहिती राजेश गुप्ता या भाजी विक्रेत्याने दिली. इंधनाबरोबरच ज्वलनशील वायूचे दर सातत्याने वाढत आहेत. यामुळे मुंबईकर आधीच त्रस्त आहे. त्यात आता भाज्या महागल्याने सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

 

दरप्रति किलो/रुपयांत  

घाऊक बाजारात भाजी

किरकोळ बाजारात भाजी
आले ५०-५६ ७०-८०
भेंडी ३०-३२ ७०-८०
गवार ३०-३८ ७०-८०
टोमॅटो १०-१९ २०-३०
भोपळा ४०-५० ७०-८०
हिरवी मिरची २८-३४ ७०-८०
पडवळ ५०-६० १००-१२०
काकडी ८-१० २०-३०
फरसबी ८०-१०० २५०-३००
ढोबळी मिरची २५-२७ ४०-६०
फ्लॉवर १६-१८ ७०-८०
कोबी ८-१० ४०-५०
वांगी १८-२७ ५०-६०
गाजर ३०-३८ ५०-६०
कोथिंबीर(प्रति जुडी) १०-३०  ४०-५०
मेथी (प्रति जुडी) २०-३० ३०-४०
शेपू (प्रति जुडी) १५-२० ३५-४०
कांदापात (प्रति जुडी) १०-२५ ३०-३५
चवळी ४०-५० ७०-८०
वटाणा  ९०-१०० १५०-१६०

 

First Published on: June 19, 2018 2:33 PM
Exit mobile version