खाद्य न मिळल्याने कोंबड्या एकमेकांना मारून खाऊ लागल्या

खाद्य न मिळल्याने कोंबड्या एकमेकांना मारून खाऊ लागल्या

कोंबड्यांना गेल्या 15 दिवसांपासून पक्षी खाद्य न मिळाल्याने कोंबड्या एकमेकींना मारुन खात आहेत. हा धक्कादायक प्रकार सांगलीतील मिरज येथील पेठवडगाव आणि हातकणंगले परिसरात घडत आहे. बाला इंडस्ट्रीज अँड इंटरटेनमेंट कंपनीने दीड लाख कोंबड्या शेतकर्‍यांना दिल्या आहेत. कोंबड्या एकमेकींना मारुन खात असल्यामुळे भविष्यात येथे मोठी रोगराई पसरु शकते. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
हातकणंगले तालुक्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण शेती बरोबर पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. बहुतेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरु केला आहे. मिरज इथल्या बाला इंडस्ट्रीज अँन्ड इंटरटेनमेंट कंपनी पेठवडगांव आणि हातकणंगले परीसरातील शंभरहून अधिक शेतकर्‍यांना दीड लाख अंडी उगवणीसाठी कोंबड्या पुरवल्या होत्या.

अंडी उबवल्यापासून 40 दिवसापर्यंत त्यांना कंपनीच्या सांगली जिल्ह्यातील कानंदवाडी इथल्या पक्षीखाद्य कारखान्यातून पक्षीखाद्य पुरवठा केला जातो. 40 दिवसानंतर कोंबड्या कंपनी परत नेते आणि शेतकर्‍याला मजुरी देते. पण करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने या कंपनीने परीसरातील जवळपास दीड लाख कोंबड्यांना पक्षीखाद्य नाकारले आहे. प्रशासनान पशुखाद्यसाठीचा परवाना घेऊन पक्षीखाद्य वितरण करण्यास मुभा दिली असतानाही पशुखाद्य देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

कोंबड्या उचलण्याचा कालावाधी संपून 10 ते 15 दिवस झाले तरीही कोंबड्या नेल्या नाहीत. तसेच पक्षीखाद्य ही दिले नाही. त्यामुळे भुकेनं व्याकुळ झालेल्या कोंबड्या एकमेकांना मारुन खात आहेत. येत्या काही दिवसात व्यवस्था न झाल्यास लाखो कोंबड्या भुकेनं मरुन जातील अन रोगराई मोठ्या प्रमाणात पसरेल. याचा सर्वाधिक फटका पेठवडगांव सह परीसराला बसणार आहे. सद्या या परीसरात दुर्गंधी पसरली असून माशांचे प्रमाण वाढलं आहे. याबाबत पेठवडगांव नगरपालीका नगराध्यक्ष मोहनलाल माळी आणि मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांचेकड तक्रार केली.असून नगराध्यक्ष माळी यांनी कंपनी अधिकार्‍यांशी संपर्क केला असता कंपनी अधिकार्‍यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.

First Published on: April 1, 2020 1:53 AM
Exit mobile version