Corona: कोरोना प्रतिबंधविषयक खरेदीचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना

Corona: कोरोना प्रतिबंधविषयक खरेदीचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना

कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस ५० लाख रुपयांपर्यंतचे तर जिल्हा परिषदेस ५० लाख रुपयांवरील खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. पण सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. तथापि, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करणे महत्वाचे आहे. त्यामुळे संबंधीत शासन निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवून स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

कोरोना प्रतिबंधविषयक बाबींची खरेदी करताना संबंधीत शासन निर्णय तसेच खरेदीसंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करुन यथोचित कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

First Published on: May 28, 2021 10:47 PM
Exit mobile version