‘हा कौल विरोधकांसह आमची झोप उडवणारा’

‘हा कौल विरोधकांसह आमची झोप उडवणारा’

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली प्रतिक्रिया दिली. दुपारी २ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यासह देशात पुन्हा एकदा मोदी लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा हा कौल विरोधकांसह आमचीही झोप उडवणारा असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री 

हा निकाल झोप उडवणारा आहे. लोकांनी दिलेल्या प्रचंड प्रेमाला आता जागणं आम्हाला भाग आहे. तेव्हा गरिबांच्या, वंचितांच्या विकासासाठी आम्हाला अधिक काम करावं लागेल अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसंच ही निवडणूक भाजप जिंकेल असा विश्वास आधीपासूनच होता असंही त्यांनी सांगितलं. दरवेळी सत्ताधारी पक्षाबद्दल जनतेच्या मनात रोष असतो ज्याला अॅण्टी-इन्कंबन्सी म्हटलं जातं. पण यावेळी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारबद्दल जनतेच्या मनात पोषक वातावरण अर्थात प्रो-इन्कंबन्सी आहे असा दावा फडणवीस यांनी केला आहे. मोदींच्या आणि राज्यातील भाजप सरकारच्या विकास कामांचं कौतुक त्यांनी केलं. लोकांचा मोदींवर प्रचंड विश्वास आहे हे देशात फिरताना अनेकदा जाणवत असल्याची माहितीही त्यांनी दिली. विरोधकांच्या टीकेचा काही परिणाम मतदारांवर झाला नसून आधीपेक्षा जास्त मतांनी यावेळी मोदींना निवडून दिलं आहे, आधीपेक्षा जास्त प्रेम मोदींना लोकांनी दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले. तसंच गेली पाच वर्ष ज्या शिवसेनेवर टीका केली त्याच शिवसेनेने सहकार्य केल्याबद्दल त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले आहे. एनडीएतील इतर घटक पक्षांचेही यावेळी त्यांनी आभार मानले.

१७ व्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून देशातील ३००हून अधिक जागांवर तर राज्यातील ४१ जागांवर रालोआ आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले आहेत. ‘निवडणुकीआधी देशात मोदींची ‘मुक लाट’ असून ती त्सूनामीत परिवर्तीत होईल असं मी सांगितलं होतं. आजच्या निकालातून हेच चित्र स्पष्ट झालं आहे. देशात मोदींची त्सुनामीच आहे’. अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं.

First Published on: May 23, 2019 2:54 PM
Exit mobile version