मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील नाले सफाईची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील नाले सफाईची पाहणी

नालेसफाईच्या कामांवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील नालेसफाई कामांचा आढावा घेतला. नालेसफाई होऊनही मुंबईत पाणी तुंबते आणि मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे यंदा एखाद्या भागात पाणी तुंबल्यास संबंधित पालिका अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिले आहेत. ( chief minister eknath shinde Mumbai BMC Rain in Mumbai water logged )

 

मिठी नदी व इतर नद्यांमधील आणि नाल्यांमधील गाळ हा तळापासून म्हणजे अगदी तळाला दगड लागेपर्यंत खोलवर जाऊन काढून प्रामाणिकपणे सफाई कामे करावीत. नालेसफाई कामांची जबाबदारी अधिकार्‍यांवर सोपवा, असे आदेशही त्यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना दिले. जर अधिकार्‍यांनी नालेसफाईची कामे कंत्राटदारांमार्फत प्रामाणिकपणे करून घेतली, गाळ खोलवर जाऊन काढला, पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी पंपाने निचरा करून हटविले तर यंदा पावसाळ्यात सखल भागात अधिक प्रमाणात पाणी साचून राहणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना तसेच सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी बजावले.

नालेसफाई केल्यावरही जर जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास मुंबईत काही सखल भागात पाणी साचू शकते, मात्र पालिकेने कामे अशी करावीत की जास्त पाऊस पडला तरी कोणत्याही परिस्थितीत पावसाचे पाणी कुठेही साचून राहता कामा नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिकेतील संबंधित अधिकार्‍यांना सुनावले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी मिठी नदी, वांद्रे पूर्व येथे, नंतर वाकोला नदी, होल्डिंग पाँड, प्रमोद महाजन, दादर, लव्ह ग्रोव नाला, वरळी आणि लव्ह ग्रोव स्ट्रॉम वॉटर पंपिंग स्टेशन, वरळी येथे पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिपादन केले.

मुंबईत पावसाळ्यात रस्त्यावर अथवा कुठेही पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पावसाळ्यात रेल्वेमार्गावरही पाणी साचून रेल्वे वाहतूक बंद पडू नये यासाठी रेल्वेमार्गालगतचे नाले व कल्व्हर्ट रुंद करा व त्यांची चांगली सफाई करून घ्यावी व जातीने पाहणी करावी. जर दुर्दैवाने नालेसफाई करूनही जास्त पाऊस पडल्याने पाणी साचले आणि त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट बस उपलब्ध करून पर्यायी सुविधा द्यावी, असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांना दिले.

( हेही वाचा: ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; जिल्हाप्रमुखांनी मारहाण केल्याचा दावा अंधारेंनी फेटाळला, नेमकं प्रकरण काय? )

First Published on: May 19, 2023 9:24 AM
Exit mobile version