निवृत्त कामगारांची 450 कोटींची थकबाकी गणपतीपूर्वी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे ‘बेस्ट’ला आदेश

निवृत्त कामगारांची 450 कोटींची थकबाकी गणपतीपूर्वी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे ‘बेस्ट’ला आदेश

मुंबई : बेस्टचे उपक्रमाचे मुंबईसाठी मोठे योगदान आहे. भविष्यात बेस्ट उपक्रम यशस्वी वाटचाल करेल. स्वतःच्या पायावर उभी राहून सक्षम होईल आणि बेस्ट उपक्रमच मुंबई महापालिकेला आर्थिक मदत करेल. त्यासाठी बेस्टच्या पाठीशी उभे राहून बेस्टला आवश्यक ती सर्व प्रकारची मदत महाराष्ट्र सरकार करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच, गणेश आगमनापूर्वी बेस्टच्या सेवानिवृत्त कामगारांची 450 कोटी रुपयांची थकबाकी देण्याचे आदेश बेस्ट प्रशासनला दिले.

बेस्ट उपक्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गुरुवारी संध्याकाळी नरिमन पॉइंटच्या टाटा थिएटर, एन.सी.पी.ए. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बेस्टच्या दुमजली इलेक्ट्रिक एसी बसगाडी व प्रीमियम बससेवेचे लोकार्पण आणि बेस्ट कॉफी टेबल पुस्तक, बेस्ट उपक्रमाची अमृत महोत्सवी कथा पुस्तकाचे प्रकाशन, स्वयंचलित मार्गप्रकाश व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

बेस्ट उपक्रमाचे मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शवली. बेस्टने पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बेस्टचे माफक दरातील बसपास द्यावेत, असे निर्देश बेस्ट प्रशासनाला दिले. बेस्टच्या दुमजली इलेक्ट्रिक एसी बसगाडी व प्रीमियम बसची प्रत्यक्ष सेवा प्रवाशांसाठी सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. यावेळी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री गिरीश महाजन, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.

ट्रिपल डेकर पूल व त्यावरून मेट्रो धावणे आवश्यक – गडकरी
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मी 1995ला 55 पूल बांधताना चूक केली. वास्तविक, फिलिपीन्सच्या धर्तीवर डबल व ट्रिपल डेकर पूल बांधायला हवे होते. त्यावरून मेट्रो धावायला पाहिजे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने आता त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
तसेच, बेस्टने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी आणि नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावी. भविष्यात प्रदूषणमुक्त होण्यासाठी डिझेल व पेट्रोलला हद्दपार करून इलेक्ट्रिक, बायोमिथेन, इथेनॉल, हायड्रोजन इंधनावर वाहने चालविण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापकांना केली.

मुंबईत बेस्टशिवाय जगणे अशक्य – राहुल नार्वेकर
बेस्ट उपक्रम जरी तोट्यात असले तरी बेस्टची डिजिटल व इलेक्ट्रिक वाटचाल अभिनंदनीय आहे. मुंबईत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून ते सामान्य व्यक्तींना बेस्टशिवाय जगणे अशक्य आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. तसेच, आज मुंबई महापालिका तोट्यातील बेस्टला आर्थिक मदत करीत असली तरी बेस्टची सध्याची यशस्वी वाटचाल पाहता भविष्यात बेस्ट उपक्रमच मुंबई महापालिकेला आर्थिक मदत करेल, असा दावाही राहुल नार्वेकर यांनी केला.

First Published on: August 18, 2022 10:57 PM
Exit mobile version