हिंगोलीतील ‘कावड यात्रे’त मुख्यमंत्री शिंदे यांचा सहभाग, ‘भगवान शंकरा’चा जयघोष

हिंगोलीतील ‘कावड यात्रे’त मुख्यमंत्री शिंदे यांचा सहभाग, ‘भगवान शंकरा’चा जयघोष

हिंगोली : आमदार संतोष बांगरांच्या वतीने हिंगोलीमध्ये ‘कावड यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. या कावड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी कावड यात्रेमध्ये सहभागी होत भगवान भोले शंकराचा जयघोष केला.

ऑगस्ट क्रांतिदिनाचा मुहूर्त साधत शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज सकाळी होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात जुन्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असून, दोन्ही बाजूकडून प्रत्येकी 9 असे एकूण 18 आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे काल नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर गेले होते.

नांदेड येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बांगर यांच्यासह कावड यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना 151 किलो खोबऱ्याचा हार घालून, पुष्पवृष्टी करत बांगर यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. कावड यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीत मुख्यमंत्री शिंद भगवान भोलेनाथाचा जयघोष करीत तसेच हाती भगवा झेंडा आणि त्रिशूळ घेऊन हजारो शिवभक्त आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार संजय राठोड, आमदार बालाजी कल्याणकर तसेच हजारोंच्या संख्येने हिंगोलीकर शिवभक्त उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील गांधी चौक येथे आयोजित सभेत जनतेला संबोधित केले. त्यात त्यांनी आमदार संतोष बांगर यांचे खूप कौतुक केले.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिरात भगवान शिवशंकराची पूजन करून जलाभिषेक केला. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव व यंदाच्या वर्षी बळीराजाला उत्तम पीक पाणी मिळू देत, असे साकडे त्यांनी भोलेनाथाला घातले.

मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची अपेक्षा
नादेड आणि हिंगोलीमध्ये मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सकाळी जाणार होते. मात्र आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे त्यांनी हा दौरा तात्पुरता स्थगित केला. नंतर ते पुन्हा मराठवाड्याकडे रवाना झाले. शिंदे सरकारकडून योग्य नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

First Published on: August 9, 2022 8:38 AM
Exit mobile version