मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या ठिकाणी यावे; किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची भूमिका

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या ठिकाणी यावे; किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची भूमिका

शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने भारतीय किसान सभेकडून शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी नाशिक येथून निघालेला लॉंग मार्च आज कसारा येथे पोहोचेल. पण त्याआधी या किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. पण काल जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून राज्यातील सरकारी कर्मचारी यांनी संप पुकारल्याने ही बैठक आज घेण्याचा राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला. परंतु आता या बैठकीवरून किसान सभेच्या शिष्टमंडळाने सरकारची डोकेदुखी वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.

काल किसान सभेचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमध्ये होणारी बैठक रद्द झाल्यानंतर आज किसान सभेने या बैठकीसाठी हजर राहण्यास नकार दिला. पण आता याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावे, अशी भूमिका किसान सभेच्या शिष्टमंडळाकडून घेण्यात आली आहे. याबाबतची ,माहिती माजी आमदार जे. पी. गावित यांच्याकडून देण्यात आली आहे. ज्यामुळे आता सरकारला आणखी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न किसान सभेकडून करण्यात येत आहे.

सामान्य माणूस सुद्धा सरकारला झुकवू शकते हे आता आम्ही दाखवून देणार आहोत. आम्ही मुंबईमध्ये जाणार तर मोर्चा घेऊन जाणार. सरकारला जर का आम्हाला सन्मानजनक वागणूक द्यायची असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सक्षम मंत्र्यांनी मोर्च्याच्या जागी यावे अंडी इथेच आमच्या मागण्या मान्य करून सर्वांच्या समोर निर्णय घ्यावा, आम्ही आता मुंबईला शिष्टमंडळ घेऊन येणार नाही, अशा स्वरूपाची ताठर भूमिका या मोर्च्याचे नेतृत्त्व करणारे माजी आमदार जे. पी. गावित यांच्याकडून घेण्यात आली आहे.

हेही वाचा – “पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अश्या घोषणांनी शासकीय कार्यालय दणाणली

दरम्यान, रविवारी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी किसान सभेच्या शिष्ट मंडळाची बैठक घेतली होती. त्यानंतर मुंबईमध्ये बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काल बैठकीची वेळ देखील ठरली होती, पण बैठक रद्द झाल्याने आणि सन्मान दुखावल्याने किसान सभेकडून अशा पद्धतीची ताठर भूमिका घेण्यात आली आहे का ? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. शेतकरी आपला थकवा घालवण्यासाठी नाचत-नाचत मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याची माहिती सुद्धा जे. पी. गावित यांनी दिली आहे.

First Published on: March 15, 2023 12:54 PM
Exit mobile version