म्हणून अधिवेशन संपवलं, वाचा विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री?

म्हणून अधिवेशन संपवलं, वाचा विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री?

विधानसभेत भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची मुदत २ मार्च २०१९पर्यंत होती. मात्र, मुदतीच्या ३ दिवस आधीच हे अधिवेशन गुंडाळण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे तर्क लढवले जाऊ लागले आहेत. मात्र, हे अधिवेशन इतक्या लवकर का आटोपतं घेतलं, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं यावेळी विधानसभेत सांगितलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

सीमेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत अधिवेशनासाठी तैनात असलेल्या सुमारे ६ हजार पोलीसांना मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने मोकळं करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ‘कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ६ हजार पोलीस अधिनेशनासाठी तैनात असतात. अधिनेशनादरम्यान आदोलनं आणि बऱ्याच घडामोडी इथे होत असतात. त्यामुळे पोलीस खात्याशी आमची चर्चा झाली तेव्हा त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अधिकची कुमक मिळाली तर त्यांना सुरक्षा-व्यवस्था राखणं सोपं होईल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे सकाळी मी या उच्च अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्यानंतर त्यात त्यांनी सगळ्या परिस्थितीविषयी माहिती सांगितली. त्यानंतर आम्ही सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला की सध्याचं अधिवेशन आटोपतं घेऊन पोलीस फोर्स मोकळा करावा. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राची सुरक्षा व्यवस्था आणि सीमेवरच्या तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही पोलीस कुमक वापरता येईल. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानतो आणि पटलावर जी भाषणं मांडली, त्यांना अर्थमंत्री देखील उत्तरं देतील. हे अधिवेशन कोणत्याही पॅनिक परिस्थितीमध्ये आटोपतं घेतलं जात नसून फक्त ही ६ हजारांची पोलीस कुमक मोकळी व्हावी म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे. आवश्यकता पडते, तेव्हा हे सभागृह एक होऊ शकतं, हे या अनुषंगाने सिद्ध झालंय. त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो’, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वेंची नियुक्ती

 

अधिवेशन संस्थगित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला आम्ही पाठिंबा देत आहोत. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत, हे एकत्र येऊन दाखवून दिले पाहिजे.

राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

६ हजारांचे पोलीस कशाला लागतात – जयंत पाटील 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई पोलिसांना जी काही कारवाई करायची आहे, ती करु दिली गेली पाहिजे. मात्र अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी ६ हजार पोलीस का लागतात? याचाही कधीतरी सरकारने विचार केला पाहिजे. आज हा विषय चर्चेचा नाही, मात्र मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे, त्यांनी याचा विचार करावा. तसेच भारतीय वायूसेनेचे वैमानिक वर्धमान अभिनंदन यांना पाकिस्तानने मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून लोकांच्या भावना तीव्र बनलेल्या आहेत. युद्ध कैदी असला तरी त्याला सन्मानाने भारतात पाठवले पाहिजे. या भावनेतून विधानसभेने ठराव करावा आणि राज्यपालांच्या माध्यामातून सरकारकडे पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली.
First Published on: February 28, 2019 1:13 PM
Exit mobile version