घरमुंबईमुंबईत हाय अलर्टनंतर रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ

मुंबईत हाय अलर्टनंतर रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ

Subscribe

मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. त्यामुळेच ही सुरक्षा वाढवली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता हळूहळू जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह मुंबईत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. त्यामुळेच ही सुरक्षा वाढवली असल्याचे रुग्णालय प्रशासन, पहारेकरी आणि सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

सरकारी रुग्णालयांपैकी सर्वात मोठे असणाऱ्या जे. जे रुग्णालयासह जीटी, कामा आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाची तसंच पालिका रुग्णालयांपैकी महत्त्वाच्या केईएम रुग्णालयात ही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालं.

सरकारी रुग्णालयांच्या वाढवलेल्या सुरक्षेबाबत सर जे.जे रुग्णालय समुहाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितलं की, ” महाराष्ट्रासह मुंबईत देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे, रुग्णालयांचीही सुरक्षा वाढवली आहे. जेवढे गरज आहेत तेवढेच गेट्स सुरू ठेवले आहेत. शिवाय लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही प्रयत्न केले जात आहे. “

जीटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितलं की, ” सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आणि चेकींग केली जात आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या सामानाचंही चेकींग केलं जात आहे. “

- Advertisement -

गाड्यांची तपासणी सुरु

तर, पालिका रुग्णालयांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरक्षेसाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे. हे पथक दर एक तासाने रुग्णालयाच्या सुरक्षा विषयीचा योग्य पद्धतीने आढावा घेणार आहे. त्यासोबतच रुग्णालयात येणाऱ्या दुचाकी गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात होणारी अधिकची गर्दी कमी होण्यास मदत होईल असं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -