सुलोचना दीदींचं निधन : चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री शिंदे

सुलोचना दीदींचं निधन : चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री शिंदे

 

मुंबई: “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः ‘आई’च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसतं, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी “आई’ गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत- विरोधी पक्षनेते अजित पवार

रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे. सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका चरित्र अभिनयाचा आदर्श आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातल्या अभिनयानं त्यांनी जिजाऊँ माँसाहेबांचं जिवंत दर्शन घडवलं, त्यांची ती भूमिका केवळ अविस्मरणीय आहे. सुलोचना दीदींनी गेली आठ दशकं मराठी, हिन्दी चित्रपट रसिकांच्या मनात आणि कुटुंबातही स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन हा आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी सुलोचना दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, ” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेत्री, महाराष्ट्रभूषण सुलोचना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

 

मराठी मनावर उमटविणारी छाप व्यक्ती – चंद्रशेखर बावनकुळे

आजच्या सायंकाळी हे नाते काळाने हिरावून नेले. आई, बहीण, वहिनी, आत्या, मामी, मावशी अशी अनेक कौटुंबिक नाती त्यांनी अभिनयाच्या जोरावर केवळ पडद्यावरच साकारली नाही, तर घराघरात निर्माण केली. आपल्या सोज्वळ दिसण्यासह सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आत्मीयता निर्माण केली. त्यांना राज्य सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानीत केले होते. त्यांच्या जाण्याने मी व्यथित झालो. त्यांना विन्रम आदरांजली.

 

सिनेसृष्टीची आई गेली- उद्धव ठाकरे

सुलोचना दीदी गेल्या. मराठी आणि हिंदी रुपेरी पडद्यावरील मांगल्य हरपले. आज संपूर्ण सिनेसृष्टीची आई कायमची पडद्याआड गेली, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावपूर्ण अदरांजली अर्पण केली. मराठी सिनेमाच्या सुवर्ण काळाच्या बहुधा त्या अखेरच्या साक्षीदार होत्या. त्यांचा जीवनपट खूपच संघर्षमय होता. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. ठाकरे परिवाराशी सुलोचना दीदींचा अत्यंत निकटचा स्नेह होता.

 

महाराष्ट्राचा पारिजातक आज हरपला – छगन भुजबळ

जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा पारिजातक हरपल्याच्या भावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. आपल्या शोक संदेशात छगन भुजबळ लिहितात की, आपल्या अनेक भूमिकांमुळे सुलोचना दीदी या घरा घरात तर पोहचल्याच पण सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. आजही त्यांना अनेकजण हे अमिताभ, धर्मेंद्र किंवा राजेश खन्ना यांची आई म्हणूनच ओळखतात आणि हाच त्यांच्या अभिनयाचा विजय आहे.

 

First Published on: June 4, 2023 10:20 PM
Exit mobile version