बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबईतील बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखांत घरं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित आहे. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांच्या घरांची अवस्था फार बिकट आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना किफायतशीर दरात घरे देण्याचे जाहीर केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल(बुधवार) बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरे देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी घराची किंमतच जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यामुळे यामध्ये आणखी काही चांगले निर्णय घेता येतील का हेदेखील पाहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

राज्यातील पोलिसांची संख्या २ लाख ४३ हजार इतकी आहे. त्यामुळे आम्ही एक बैठक घेतली. पोलिसांना घरं देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आम्ही शॉर्ट टर्म, मीड टर्म आणि लाँग टर्म असे तीन टप्पे केले असून एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, सीडको, मुंबई पालिका या सर्वांना एकत्र घेऊन एक धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षात सर्व पोलिसांना घरं मिळू शकतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात पोलिसांना मिळणार 25 लाखांत घर

दरम्यान, बीडीडी चाळीतल्या पुनर्विकास प्रकल्पात पोलिसांना हक्काच्या घरांसाठी 50 लाखांची किंमत जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही किंमत कमी करण्यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार, नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, यावरुन राजकारण सुरु झाले होते. एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना क्वॉर्टर्स द्या पण फुकटात घर नको. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांना फुकटात घर देणे अव्यवहारिक ठरेल, असे म्हटले होते.

बीडीडी चाळीतील २२५० सेवा निवृत्त पोलीस तसेच पोलिसांना बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ५० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांमध्ये घर देण्यात येणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली होती.


हेही वाचा : बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना घरे न दिल्यास उपोषण, कालिदास कोळंबकर यांचा इशारा


 

First Published on: August 25, 2022 5:05 PM
Exit mobile version