बंजारा बोर्डासाठी ५० कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

बंजारा बोर्डासाठी ५० कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

वाशिम – संत श्री सेवालाल महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १५ मंत्री आज पोहरादेवी येथे गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरूवात बंजारा भाषेतून केली. आज या पवित्र स्थळी, जसं उपमुख्यमंत्री म्हणाले की, ही एक पवित्र काशी आहे. या काशीमध्ये आम्हाला येण्याचं भाग्य मिळालं. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. बंजारा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे या बोर्डाच्या स्थापनेसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय आज याठिकाणी आपण घेत आहोत. वसंतराव नाईक महामंडळाला कधीही पैसे कमी पडून देणार नाही, ही सरकार आणि शासनाची जबाबदारी आहे. शासन तुमच्या समाजाच्या पाठी उभा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संत श्री सेवालाल महाराज यांचा अश्वारुढ पुतळा या ठिकाणी उभा राहिलाय. मंत्री संजय राठोड या ठिकाणी सातत्याने पाठपुरवठा करत असतात. त्यांच्या मागणीला मान्यता देऊन राज्य सरकारने ५९३ कोटी रुपये देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संत रामराव बापू यांनी देखील पाठपुरवठा केला. त्यामुळे आपल्या सर्वांना भूमिपूजनाचा योग याठिकाणी आला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

तांडा वस्ती सुधार योजनेतून चांगले रस्ते, पाणी, दिवाबत्ती, शाळा आणि अंगणवाडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे कुठल्याही मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागणार नाही. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासन करेल. त्यांना होस्टेलसाठी जी काही तरतूद लागेल, ते सुद्धा शासन करेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

या पोहरादेवीचा आणि संत श्री सेवालाल महाराजांचा आपल्या सर्वांना आज आशीर्वाद मिळालाय, असं देखील मी याठिकाणी समजतो. हा निसर्ग पूजक आणि मेहनत करणारा समाज आहे. निसर्गात रमणारा आणि लढाऊ बाणा असणारा हा समाज आज याठिकाणी भव्यदिव्य अशा प्रमाणात उपस्थित आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.

बंजारा समाज भवन देखील या नवी मुंबईत तुम्हाला मोठं भवन मिळणार आहे. वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण केंद्र हे स्थापन करण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं काम होईल. त्यामुळे ज्या काही आपल्या मागण्या आहेत. त्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी याआधी १०० कोटी दिले होते. अडीच वर्षांत तुम्हाला पैसे मिळाले होते का?, आपल्या सरकारने बंजारा समाजाला ५९३ कोटी रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला आमचा एक समाज मानतो. तुमच्या कुटुंबातील मी एक सदस्य आहे. आम्ही आपल्या समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असं शिंदे म्हणाले.


हेही वाचा : बंजारा बोलीभाषेचे संवर्धन करणार; फडणवीसांकडून अकादमीची घोषणा


 

First Published on: February 12, 2023 4:24 PM
Exit mobile version