राज ठाकरे यांची केवळ सदिच्छा भेट घेतली; एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

राज ठाकरे यांची केवळ सदिच्छा भेट घेतली; एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टिकरण देत मुख्यमंत्री शिंदे चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “गणेशोत्सवानिमित्त एक आनंदाचे वातावरण आपण सगळीकडे पाहतो. त्यानिमित्ताने आपण एकमेकांच्या घरी जातो. राज ठाकरे यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

“राज ठाकरे यांचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी मी त्यांना भेटणार होतो. पण आता गणेशोत्सवानिमित्ताने त्यांची भेट घेतली. या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आजच्या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला”, असे शिंदे यांनी म्हटले.

“आनंद दिघे साहेबांच्या आठवणी या वेळी चर्चेमध्ये निघाल्या. राज ठाकरे यांचेही आनंद दिघे यांच्यासोबत चांगले संबंध होते. शेवटी आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – सीकरमध्ये दलित विद्यार्थ्याला कपडे काढून शाळेच्या मैदानात बेदम मारहाण

First Published on: September 1, 2022 7:06 PM
Exit mobile version