हिंमत असेल तर आघाडीतून बाहेर पडा; मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरेंना आव्हान

हिंमत असेल तर आघाडीतून बाहेर पडा; मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरेंना आव्हान

तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व मान्य असेल तर तेवढी हिंमत दाखवा आणि सत्ता, खुर्चीसाठी ज्या महाविकास आघाडीसोबत गेलात तेथून बाहेर पडा, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता दिले. आज बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान करणार्‍यांना जोडे मारले असते. शिवाय असा अपमान निमूटपणे सहन करणार्‍यांनाही जोडे हाणले असते, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगावच्या सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहेत. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ठणकावून सांगितले होते. राहुल गांधी यांनी त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर माफी मागायला मी सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीने उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार सावरकरांचे कार्य पुन्हा समाजासमोर आणण्यासाठी राज्यभरात सावरकर यात्रा काढण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले, शिवाय राहुल गांधींवरही जोरदार टीका केली.

सावरकरांचा अपमान होत असताना विधिमंडळ अधिवेशनात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे नेते, आमदार यांनी राहुल गांधींच्या विरोधात एकही शब्द काढण्याची हिंमत दाखवली नाही. केवळ राजकारणासाठी, आघाडीसाठी आमदार अधिवेशनात मूग गिळून बसले होते. राहुल गांधी यांची खासदारकी नियमानुसार रद्द झाली असताना काळ्या फिती लावून त्यांचा बचाव करण्यात आला. त्यामुळे जाहीर सभेत अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार, असा सवाल शिंदे यांनी ठाकरे यांना केला. अपमान सहन करणार नाही हे विधान म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. बोलून काही होणार नाही, तुमची भूमिका कृतीतून दिसली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

सावरकरांचा अपमान झाला म्हणून विधान भवनाच्या आवारात आंदोलन झाले. हे आंदोलन म्हणजे चीड, संताप याचा परिपाक होता. देशभक्तांच्या विरोधात जे बोलतील त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरणार आहे. राहुल गांधी सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान करतात. वीर सावरकर यांचा अपमान मणिशंकर अय्यर यांनी केला होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. कालच्या सभेत सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणणारे अशी हिंमत दाखवणार का? राहुल गांधी यांच्या पुतळ्याच्या थोबाडीत मारणार का? तुम्ही सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमके काय करणार ते तरी सांगा, असा सवाल शिंदे यांनी केला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढविला. राहुल गांधींच्या कृत्याचा आणि त्यांच्या वृत्तीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. सगळ्यांनीच त्यांचा निषेध करायला हवा होता. ज्यांनी सावरकरांचा अवमान केला ते वारंवार सांगत आहेत की, मी सावरकर नाही, मी गांधी आहे, पण सावरकर होण्याची तुमची लायकीदेखील नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही, मग तुम्ही सावरकर कसे काय होऊ शकता? सावरकर व्हायला त्याग आणि देशाबद्दल प्रेम असावे लागते. तुम्ही तर परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता. यापेक्षा या देशाचे दुसरे दुर्दैव काय असू शकते. अशी निंदा करणे हा खर्‍या अर्थाने एकप्रकारे देशद्रोहच आहे, असे शिंदे यांनी सुनावले.

राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावे, मात्र ते तसे करणार नाहीत. कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही, गांधी आहे. ते सावरकर होऊच शकत नाहीत. त्यांची ती लायकीच नाही, अशी टीकाही शिंदे यांनी केली.

सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनासह अनेक क्षेत्रांत अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम त्यांनी केले. कितीतरी क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही, असे सांगताना राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, सत्तेला लाथ मारण्याची यांची हिंमत नाही. केवळ यांच्या भाषणात सावरकर जिवंत राहतील. सावरकर कृतीत राहणार नाहीत किंवा दिसणार नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.

First Published on: March 28, 2023 6:00 AM
Exit mobile version