बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्दच… पाकिस्तान त्यांना घाबरायचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्दच… पाकिस्तान त्यांना घाबरायचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्दच. शब्द फिरवायचा नाही ही त्यांची शिकवण आम्ही शिकलो. अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यामुळेच या महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या. शेवटी धाडस महत्वाचे असते. धाडस करायला हिंमत, ताकद लागते. त्यासाठी गुरूदेखील तेवढे धाडसी हवे. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आणि गुरुही होते. आज आनंद दिघे असते तर त्यांना अभिमान वाटला असता. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाण्यात त्याचं पालन व्हायचं. ठाणं आणि शिवसेना हे नातंच वेगळं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये आज बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. हिमालयाएवढा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. पाकिस्तानदेखील कुठलाही नेता, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना घाबरत नव्हता. फक्त एकाच नावाला घाबरत होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांमुळे ठाण्यात पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. बाळासाहेबांनी जे धाडस दिलं ते पुढे घेऊन आम्ही जात आहोत. बाळासाहेबांनी अन्यायाविरोधात ताकद, लढण्याचे विचार त्यांनी दिले. बाळासाहेबांनी जात-पात मानली नाही. बाळासाहेबांना भेटायला आलेल्या मुस्लिम बांधवांना नमाज अदा करायलाही त्यांनी जागा दिली. पण पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना त्यांनी जशास तसे उत्तर दिले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. माझ्यासारखे सर्वसामान्य शिवसैनिक या विधानसभा आणि लोकसभेपर्यंत पोहोचू शकले. व्यासपीठावर अनेकजण आहेत. तसेच समोरही बसले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा आणि प्रभाव आमच्यावर होता. त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही स्थापन केले. बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीची अमलबजावणी केली. बाळासाहेबांमुळेच सत्ता सामान्यांपर्यंत पोहोचली, असं शिंदे म्हणाले.

बाळासाहेब नेहमी म्हणायचे की, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही, आता त्याचा अनुभव आम्ही घेतोय. मी सूर्याचा भक्त आहे. सूर्य ज्यावेळी आकाशात उगवतो त्यावेळी सगळीकडे भगवा रंग पसरतो, तोच आता जगात पसरल्याचं पाहायचं आहे असं बाळासाहेब म्हणायचे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोड केली नाही, मुख्यमंत्रीपदासाठी…; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला


 

First Published on: January 23, 2023 10:03 PM
Exit mobile version