दीक्षाभूमीला निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

दीक्षाभूमीला निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. आंबेडकरांना मानवंदना देताना

नागपूरातील दीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसा स्थळ बनवण्यासाठी १०० कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४० कोटी रुपये हस्तांतरित झाले असून दीक्षाभूमीला विकासनिधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दीक्षाभूमी येथे आयोजित ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण

यावेळी दीक्षाभूमीच्या विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या शंभर कोटींच्या निधीपैकी ४० कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारक समितीला प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच इतर सर्व मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिन सर्वांसाठी प्रेरणादायी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी लाखो अनुयायांना धम्माचा, अहिंसेचा, पंचशीलाचा मार्ग दाखविला. गौतम बुद्धांनी साऱ्या जगाला आपल्या प्रेमाच्या शक्तीने जिंकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही तथागत गौतम बुद्धांच्या पंचशीलाच्या माध्यमातून शिकवण दिली. धम्मतत्वांच्या आधारावरच भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या शिकवणीचा संविधानामध्ये समावेश केला. आपल्या देशाचे संविधान जगातील सर्वोत्तम संविधान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

३२ हजार शाळांमध्ये संविधान वाचन सुरु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातूनच देशाने प्रगतीची विविध शिखरे गाठली आहेत. राज्यातील ३२ हजार शाळांमध्ये संविधान वाचन सुरु असून यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. संविधानातील मुल्यांची शिकवण प्रत्येक शाळांमधून दिली जात असून या मुल्यांच्या आधाराने अनेक चांगले बदल घडतील. मुंबईतील इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. दीक्षाभूमी हे जगाचे वैभव असून जागतिक दर्जाचे वारसास्थळ म्हणून हे विकसित करण्यात येत आहे. दीक्षाभूमी येथील विकास कामांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ४० कोटी रुपयांचा पहिला टप्प्यातील निधी वितरीत करण्यात आला आहे. हा विकास आराखडा वेगाने प्रगती पथावर नेण्यासाठी यापुढेही भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध लाभार्थ्यांसाठी विविध विभागांच्या माध्यमातून विकास योजना राबविण्यात येत आहे. देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच सर्वतोपरी मार्गदर्शक असून या संविधानाच्या आधारावरच देशाची वाटचाल होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बुद्धीस्ट सर्किटवर महामार्गाचे जाळे

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, तथागत गौतम बुद्धांचे विचार सर्व जगासाठी मार्गदर्शक असून या विचारांचा अवलंब अनेकांनी केला आहे. गौतम बुद्धांच्या विचारातून आपणही प्रेरणा घेतली पाहिजे. दीक्षाभूमी येथील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून आराखड्यातील यापुढील कामांसाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. केंद्र शासनाच्या माध्यमातून लुंबीनी, गया, सारनाथ, कुशीनगर यासारखी बौद्धस्थळे बुद्धीस्ट सर्कीट अंतर्गत महामार्गांनी जोडण्यात येत आहे. या महामार्गाच्या बांधणीचे काम वेगात सुरु असून याद्वारे परदेशी पर्यटक तसच लाखो अनुयायांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

First Published on: October 19, 2018 5:18 PM
Exit mobile version