मुख्यमंत्री बांधावर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट, मदतीचे आश्वासन

मुख्यमंत्री बांधावर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट, मदतीचे आश्वासन

संग्रहित छायाचित्र

 

धाराशिवः तुळजापूर तालुक्यातील मोर्डा आणि वाडी बामणी येथे भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वादळ आणि अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचे आश्वासन दिले.

मोर्डा गावातील सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे या दांपत्याच्या द्राक्ष बागेच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. दोन एकर क्षेत्रावरील ही द्राक्ष बागायत ८ एप्रिलच्या वादळी पावसाने भुईसपाट झाली होती. या दांपत्याची भेट घेऊन मुखमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी या दाम्पत्याने कोणकोणते कर्ज घेतले आहे याची त्यांनी विचारपूस केली. पूर्णपणे सपाट झालेल्या या द्राक्ष बागेची पाहणी करून लवकरात लवकर मदत करण्यात येईल,असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

यानंतर वाडी बामणी या गावातील बाबासाहेब उंबरदंड यांच्या शेतातील कलिंगड, ड्रॅगन फ्रुट पिकाच्या नुकसानीची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली.  पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर झाल्यानंतर लवकरात लवकर मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, तुळजापूरचे आ. राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १ लाख रुपयांची मदत जाहिर करावी, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.

पाच पानी पत्रात अजित पवार यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसाचा तपशील मांडला आहे.  पंचनाम्यांना होणारा उशीर, मदतीसाठी असलेले निकष या सर्व बाबींवर राज्य शासनाने विचार करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी फिरले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या मागणीचा विचार केला जाणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

First Published on: April 11, 2023 8:58 PM
Exit mobile version