मी पॅकेजवाला नव्हे मदत करणारा मुख्यमंत्री

मी पॅकेजवाला नव्हे मदत करणारा मुख्यमंत्री

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्रीदेखील मदत करणारे मंत्री आहेत. मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितले आहे. अजूनही सांगली, कोल्हापूरमधले पाणी पूर्ण ओसरायचे आहे. या संकटाचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मदतीवर विचार करणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे सांगितले.

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी सरकारने भरीव मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीवरील कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आणि विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगितले. तात्काळ मदत आम्ही जाहीर केलीच आहे. एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज देखील मी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली आहे. हे एनडीआरएफचे निकष २०१५चे आहेत. गेल्या वेळी आपण एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन मदत केली आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस इथेच आहेत हे मला कळले. त्यांना मी सांगितले, थांबा मी येतोय. कारण मला लोकांच्या जिवाशी खेळ करायचा नाही. यात कुठेही मला राजकारण करायचे नाहीये. यात त्यांच्याही काही चांगल्या सूचना असतील, तर त्याचे स्वागतच करू. तिथे काही बंद दरवाजाआड आम्ही बोललो नाही. दरवाजेच नव्हते. सगळ्यांच्या घरात पाणीच घुसले होते, तर दरवाजे का राहतायत. मी त्यांना सांगितले की तुम्हाला मी बोलावतो. मुंबईत आपण भेटू. ज्या सूचना असतील, त्यांच्यावर एकमत होईल. माझ्यासोबत तीन पक्ष आहेतच. तो चौथा पक्ष देखील येईल. महाराष्ट्रातले हे प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर उद्या जे काही आपण निर्णय घेऊ, त्याच्या आड कुणीही येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

First Published on: July 30, 2021 11:21 PM
Exit mobile version