३० जूननंतरही राज्यातील लॉकडाऊन उठणार नाही

३० जूननंतरही राज्यातील लॉकडाऊन उठणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

येत्या ३० जूननंतरही राज्यातील लॉकडाऊन उठणार नाही. काही गोष्टी काळजीपूर्वक सुरू करण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आरोग्य सेवेतील डॉक्टरांचे आभार मानले. तसेच सर्व धर्मिय प्रतिनिधींचे त्यांनी आभार मानले. करोनाच्या संकटात सर्वांनीच आपापले सणवार साध्या पद्धतीने आणि सरकारचे नियम पाळल्याने मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणार असून देवाला साकडे घालणार असल्याचे ते म्हणाले.

गर्दी वाढली, केसेस वाढल्या तर नाईलाजाने लॉकडाऊन पुन्हा करावा लागेल असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. आज मी तुम्हालाच विचारतोय तुम्हाला पुन्हा लॉकडाउन हवाय का? जर नको असेल तर मास्क लावणे, हँड सॅनेटायझर वापरणे, हात धुत राहणे, गरज नसेल तर घराबाहेर न पडणे, उगाच गर्दी न करणं हे उपाय जर पाळले नाहीत तर नाईलाजाने लॉकडाउन पुन्हा करावा लागेल. तुम्हाला लॉकडाउन हवाय का? तुम्ही नियम पाळले नाही तर मात्र लॉकडाउन पुन्हा लागू करावा लागेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षण सुरु होण्याला सध्याच्या परिस्थितीत महत्व दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी १ जुलै रोजी येणार्‍या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने डाक्टरना शुभेच्छा दिल्या तसेच हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस असून, हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात दिवसरात्र शेतात राबून अन्नधान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांनाही मी विनम्र नमस्कार करतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्यातील एकसंघपणा कायम ठेवताना आतापर्यंत शासनाला ज्याप्रकारे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढे ही कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मियांना धन्यवाद देताना म्हटले की, सर्वांनी सामाजिक भान ठेऊन शिस्तबद्धरितीने सगळे सण साधेपणाने आणि घरातल्या घरात साजरे केले. सर्वांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. वारीचा सोहळा यावेळी नाईलाज म्हणून संयम दाखवत साजरा केला जात असताना वारकर्‍यांचा, राज्यातील विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठ्ठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही व त्याच्या चरणी करोनामुक्त राज्याचे साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करू. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करून त्यांना सलाम करू. शेतकरी अपार कष्ट करून बियाणे पेरतो आणि ते उगवत नाही, हे दुर्दैव. ज्यांनी शेतकर्‍यांना फसवले त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकर्‍यांना फसवले त्यांच्याकडून वसुली करून नुकसान भरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

प्लाझ्मा दात्यांनी पुढे यावे
करोना संकटाचा सामना करताना अनेक नवनव्या औषधांची नावे पुढे येत आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, रेमडेसिवीर अशा औषधांचा वापर जगभरात होत आहे. यामध्ये महाराष्ट्र कुठेही मागे नाही. करोना रुग्णांसाठी सध्या जगभरात प्लाझ्मा पद्धती वापरण्यात येत आहे. करोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्माच्या मदतीने ९० टक्के करोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे करोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांनी पुढे यावे आणि प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

First Published on: June 29, 2020 7:02 AM
Exit mobile version