अच्छे दिन आएंगेची थापेबाजी चालणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अच्छे दिन आएंगेची थापेबाजी चालणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रत्येक व्यक्तीला समान पाणी यात राजकारण करायचे नाही. पण काहींच्या वैचारिक प्रदूषणात वाढ झाली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करणारे गंगेत न्हाऊन आले आहेत. निवडणुका आल्या की, थापा मारायच्या. अच्छे दिन आएंगे, आएंगे वाट बघा. ही थापेबाजी एकदा, दोनदा, तीनदा पण सतत नाही चालणार. लोकांनी थापेबाजी का सहन करायची ? लोकांनी जाब विचारला पाहिजे, या भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता तोफ डागली.

मुंबई महापालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी’ या धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते शनिवारी गोरेगांव पूर्व परिसरातील नागरी निवारा परिषदेच्या जवळ असणा-या ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान’ या ठिकाणी करण्यात येणार आला. यावेळी, मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, शिवसेना खासदार गजानन कीर्तिकार, आमदार सुनील प्रभू, आ. रवींद्र वायकर, आ. प्रकाश सुर्वे, आ.विलास पोतनीस, म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी महा
पौर किशोरी पेडणेकर, माजी उप महापौर सुहास वाडकर, पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येक व्यक्तीला समान पाणी यात राजकारण करायचे नाही. पण काहींच्या वैचारिक प्रदूषणात वाढ झाली असून निवडणुका जवळ आल्या की थापा मारायच्या, अशी सडकून टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
गेल्या निवडणुकीत काहींनी घरा घरात नळ देण्याची घोषणा केली होती. निवडून आल्यावर विचारले तर प्रत्येकाला नळाच्या तोट्या दिल्या. अच्छे दिन आयेगे अशा फसव्या घोषणा आम्ही करत नाही, असा कडव्या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

१४ तारखेला मास्क विरोधकांवर तोफ डागणार

आज मी मास्क काढून बोलत आहे. सर्वांसाठी पाणी यासारख्या चांगल्या योजनेत मी राजकारण आणणार नाही. मात्र येत्या १४ तारखेच्या सभेत मी मास्क काढूनच बोलणार आहे, असे ठणकावून सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप, मनसे या विरोधकांवर राजकीय तोफ डागणार असल्याचा इशाराच दिला आहे.

सर्वांसाठी आरोग्य योजना

मुंबई महापालिका मुंबईकरांना विविध सुविधा देते. चांगल्या दर्जाचे शुद्ध पाणी पुरवठा करते. आता सर्वांना पाणी देणार आहे. आता जून महिन्यात मोफत आरोग्य तपासणी सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिले चाचणी केंद्र जूनमध्ये सुरु करण्यात येणार असून टप्याटप्याने १०० केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये एमआरआय तपासणी व इतर तपासण्या मोफत असतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दिलदार विरोधी पक्ष नाही

मुंबई महापालिका, राज्य सरकार इतकी कामे करते मात्र त्यासाठी कौतुकाची थाप मारणारे कमीच. उलट उठसुठ भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप करणारे गंगेत नाहून आले आहेत का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. विरोधीपक्ष हा फक्त विरोध करण्यासाठी नसून सूचना करणे, चांगले काम केल्यास राज्य सरकारचे कौतुक करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य. पण विरोधी पक्ष हा दिलदार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी भाजपचे नाव न घेता केली.

मोफत पाणी द्या : मंत्री वर्षा गायकवाड यांची मागणी

मुंबईकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना मुंबई महापालिका आता घरात घरात पाणी देणार असून ही काळाची गरज आहे. मात्र पालिकेने मुंबईकरांना मोफत पाणी द्यावे, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, सर्व काही मोफत दिले तर अंगलट येते, मात्र सर्वांना पाणी समान दरात देण्याचे सूतोवाच केले.

मुंबईकरांच्या समस्या सोडवणार : आदित्य ठाकरे

मुंबईकरांना भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नावर आम्ही तोडगा काढून आता घराघरात सर्वांना पाणी देणार आहोत. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या एक एक करून आम्ही मार्गी लावत असून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुंबई महापालिकेकडून नागरिकांना देण्यात येर असलेल्या विविध सेवसुविधांबाबत थोडक्यात माहिती दिली.


हेही वाचा : जय श्री राम! असली आ रहा है, नकली से सावधान, शिवसेनेची अयोध्येत पोस्टरबाजी


 

First Published on: May 7, 2022 9:24 PM
Exit mobile version