जेवण आवडलं का? समाधानी आहात ना? मुख्यमंत्र्यांनी केली लाभार्थींना विचारणा

जेवण आवडलं का? समाधानी आहात ना? मुख्यमंत्र्यांनी केली लाभार्थींना विचारणा

महाराष्ट्र शिवआघाडी सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीला सुरुवात झाली असून या योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असून येत्या काळात या योजनेची व्यापी वाढविणार असल्याची घोषणा मंगळवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत केली. दरम्यान, सध्या हजारावर असणारी ही योजना लाखांच्या घरात नेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर योजनेला महाराष्ट्रातील जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी मंगळवारी संवाद साधत या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहेत की नाही, याची खातरजमा करुन घेतली.

शिवभोजन योजनेचा राज्यात शुभारंभ

प्रजासत्ताक दिनी शिवभोजन योजनेचा राज्यात शुभारंभ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर आणि नंदूरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. तेव्हा हाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसत होता. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी छगन भुजबळ यांनी वरील माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थींशी संवाद

दरम्यान, साहेब एरवी जेवायला ५० रुपये लागायचे आता दहा रुपयात जेवण होते…तुम्ही शिवभोजन थाळी सुरु करून आमच्यासाठी खुप चांगली सोय केली बघा, नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या योगेश शिंदे यांनी जेवता जेवता आपली प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना सांगितली. थेट आमच्याशी बोलून आमची चौकशी करत असल्याबद्दलचा आनंद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, केंद्राचे सचिव योगेश अमृतकर यांच्याशीही मुख्यमंत्री बोलले, केंद्रातील सुविधा आणि येणारा अनुभव मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतला.

तर ही फक्त जेवण्याची थाळी नाही तर सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात. अन्नदाता सुखी भव् ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे शिवभोजन योजनेत जेवण देताना स्वच्छता, टापटीप, जेवणाचा दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रचालकांना दिल्या. शिवभोजन योजनेतील केंद्र चालकांची एक बैठक मुंबईत आयोजित करण्याची सुचना त्यांनी विभागाच्या सचिवांना यावेळी केली.

लोकांकडून स्वागत

दरम्यान, या योजनेचा अनेकांनी स्वागत केले आहे. अनेकांनी यावेळी प्रतिक्रिया देताना लाभार्थी म्हणाले की, साहेब हा शासनाचा खुप अभिनव उपक्रम आहे, तुमची कल्पना खुप छान आहे. लोकांचा खुप चांगला प्रतिसाद आहे, आतापर्यंत दररोज १५० थाळया गेल्या, या शब्दात राजश्री सोलापुरे यांनी यावेळी आपला आनंद व्यक्त केला. केंद्रात ७२ लोकांना जेवणास बसण्याची सोय असल्याची माहिती त्यांनी दिली. हॉस्पीटलच्या आवारात हे केंद्र सुरु झाल्याने गोरगरीब जनतेला या थाळीचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. येथे जेवणासोबत लोणचे ही दिले जात असल्याचे शिवभोजन थाळीचा आस्वाद घेणाऱ्यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘तेव्हा पंकजा मुंडे गोट्या खेळत होत्या का?’


 

First Published on: January 28, 2020 7:27 PM
Exit mobile version