कोईम्बतूरहून हिस्सारला जाणाऱ्या ट्रेनला आग; मालडबा जळून खाक

कोईम्बतूरहून हिस्सारला जाणाऱ्या ट्रेनला आग; मालडबा जळून खाक

पनवेल : तामिळनाडूतील कोईम्बतूर येथून हरियाणातील हिस्सार येथे जाणाऱ्या ट्रेनला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या ट्रेनच्या मालडब्याला आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. (Coimbatore to Hisar train catches fire goods rack burnt down at panvel)

मिळालेल्या माहितीनुसार, कोईम्बतूरहुन हिस्सारला जाणाऱ्या या एसी एक्सप्रेस ट्रेनला कोकण रेल्वे मार्गांवरील पनवेल तालुक्यातील पिसार्वे या ठिकाणी आग लागली. या आगीची माहिती मिळताच सिडकोच्या कळंबोली अग्निशमन दलातील खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

काही तासांनंतर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. या आगीत ट्रेनचा मालडबा जळून खाक झाला. मात्र या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

या घटनेत मालाडब्यात ठेवण्यात आलेले सामान जळून खाक झाले. मात्र, अद्याप कशामुळे लागली याचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. या आगीमुळे कोईम्बतूरहुन हिस्सार येथे जाणाऱ्या एसी ट्रेन मधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान,  यंदा नवीन वर्षाचा दुसराच दिवस रेल्वे अपघाताचा ठरला होता. कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 जानेवारी 2023 रोजी राजस्थानमधील पाली येथे वांद्रे-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरले. पहाटे 3:27 वाजताच्या सुमारास हा रेल्वे अपघात झाला होता. वांद्रे-टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच तातडीने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ प्रवाशांची सुटका केली. त्यानंतर संपूर्ण रेल्वे खाली करण्यात आली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले होते.


हेही वाचा – व्हायरल व्हिडीओ : भरसभेत बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंना भाषणास नकार दिला; नेमके प्रकरण काय?

First Published on: January 22, 2023 6:36 PM
Exit mobile version