उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंमध्ये कोल्डवॉर?

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंमध्ये कोल्डवॉर?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून उसळलेल्या वादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमालीची सावध भूमिका घ्यायला लागले असून आता ताकही फुंकून पिऊ लागले आहेत. त्यामुळेच त्यांनी राज्याचे नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बदली आणि नियुक्ती यासाठी दिलेल्या शिफारस पत्रांनाही सोळा दिवसांनंतर मंजुरी दिलेली नाही. केवळ कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पदाच्या नियुक्तीच्याच नव्हे तर नगर विकासाच्या अन्यही काही महत्त्वाच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांकडून रिजेक्ट होऊन परत आल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र मातोश्रीवरून परिवहन मंत्री Adv. अनिल परब यांचे वजन वाढवण्यात येत असून त्याद्वारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे खच्चीकरण केले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.

राज्याचे नगर विकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात 25 मार्च रोजी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिफारस पत्र दिले होते. गेल्या 25 मार्च रोजी एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्याबाबतचे शिफारस पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या शिफारसी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहसा डावलत नाहीत. अगदी काही दिवसांपर्यंत एकनाथ शिंदेंनी बोलावे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी ‘मम’ म्हणावे अशाच सरळ साध्या पद्धतीने राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा कारभार सुरू होता. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख असताना विधिमंडळात आणि राज्याच्या मंत्रिमंडळातही एकनाथ शिंदे सांगतील तीच शिवसेनेची अधिकृत भूमिका समजली जात असे. मात्र, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यानंतर अचानक मातोश्रीवर परिवहन मंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री Adv. अनिल परब यांचे महत्त्व वाढले.

शिवसेनेतील आणि मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनुसार Adv. अनिल परब यांचे महत्त्व मातोश्रीनेच हेतूपुरस्सर वाढवले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जसजसे Adv. अनिल परब यांचे मातोश्रीवरील वजन वाढू लागले तसतसे राज्य मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे खाते समजले जाणार्‍या नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ लागल्या. त्याचा पहिला झटका एकनाथ शिंदे यांना गेल्या वर्षी बसला. नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर येथील महापालिका आयुक्तांच्या नियुक्त्या एका महिन्याच्या कालावधीतच मुख्यमंत्री कार्यालयाकडून परस्पर रद्द करत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. नगर विकास खात्याबरोबरच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना खरं तर हा मोठा धक्का होता. मात्र,राजकारणात मुरलेल्या एकनाथ शिंदे यांनी हा धक्का कोणालाही जाणवू दिला नाही.

मंत्रिमंडळात तसेच राज्याच्या राजकारणात नगर विकास खाते हे हेवीवेट खाते समजले जाते. मुंबई महापालिकेपासून ते राज्यातील कोणत्याही महापालिका, नगरपरिषदा, एमएमआरडीए, पीएमआरडीए, नागपूर विकास प्राधिकरण, सिडको यासारख्या स्वायत्त आणि विकासाचा मूलभूत केंद्र असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार नगर विकास खात्यामार्फत चालतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास खाते हे स्वतःकडेच ठेवत असत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खाते स्वतःकडे न ठेवता ते शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते व अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. मात्र हळूहळू नगर विकास खात्यामध्ये वरूण सरदेसाई यांच्यामार्फत शिवसेना नेत्यांचा हस्तक्षेप वाढू लागला. त्यातच एकनाथ शिंदे यांची भाजप नेत्यांशी असलेली जवळीक मातोश्रीला अधिक खटकू लागली. राज्यातील भाजप नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नसताना एकनाथ शिंदे मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपला बरोबर घेऊन कारभार चालवतात, असा सेनेतील एका गटाचा सूर असतो.

त्यातच विधानसभा सभागृहात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘सीएम मटेरियल’ केल्यापासून सेना नेत्यांच्या भुवया अधिकच उंचावल्या गेल्या आहेत. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून नगर विकास मंत्री आणि विधिमंडळ शिवसेना नेते असताना देखील एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आले.

संजय राठोड, Adv. अनिल परब अशा एकापाठोपाठ एक सेनेच्या मंत्र्यांवर राज्यात विरोधी पक्ष असलेला भाजप तुटून पडत असताना नगर विकास सारखे क्रिम खाते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर मात्र भाजप नेत्यांची स्तुतीसुमने कशी पडतात? असा प्रश्न मातोश्रीला पडला आहे. त्यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

First Published on: April 12, 2021 9:35 AM
Exit mobile version