मान्सूनपूर्व रस्ते, नालेसफाई कामांना वेग देण्याचे आयुक्तांचे आदेश, मुख्यमंत्रीही करणार पाहणी

मान्सूनपूर्व रस्ते, नालेसफाई कामांना वेग देण्याचे आयुक्तांचे आदेश, मुख्यमंत्रीही करणार पाहणी

लहरी हवामान व अवकाळी पाऊस पाहता मान्सूनपूर्व आवश्यक नालेसफाई, रस्ते कामे यांना वेग देण्याचे व या कामांचा पाठपुरावा करून स्वतः प्रत्यक्ष पाहणी सहायक आयुक्त आणि परिमंडळ स्तरावर उपायुक्तांनी आपल्या विभागातील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, असे आदेश आयुक्त इकबाल चहल यांनी दिले. करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी संबंधित खाते प्रमुखांना दिले आहेत. विशेष बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लवकरच पावसाळापूर्व कामांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार असून कामांचा आढावा घेणार आहेत.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांनी, शुक्रवारी पालिका मुख्यालयात पावसाळापूर्व कामांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगातील हवामानात कमी – अधिक प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहेत. हिमालयात बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत आहे. वाढते वायू प्रदूषण आणि अवकाळी पाऊस पाहता पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नद्या, लहान – मोठ्या नाल्यांची सफाई कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. अन्यथा अवकाळी पावसामुळे नालेसफाईची कामे रखडतील, अशी भिती कदाचित पालिका आयुक्त यांना वाटली असावी. त्यामुळेच आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामांचा आढावा घेतला. मार्च महिन्यात नुकताच झालेला पाऊस हा मागील आठ दशकांमध्ये महिन्यात झालेला सर्वाधिक पाऊस ठरला, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

रस्ते कामांनाही गती द्या, मुख्यमंत्री करणार पाहणी

मुंबईत सिमेंट काँक्रीट व डांबरी रस्त्यांच्या पुनर्पुष्ठीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. काही कामे प्रगतीपथावर असून काही कामे प्रस्तावित असली तरी रस्त्यांच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेवून रस्त्यांची कामे जलदगतीने करावीत, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा एक भाग म्हणून रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची १११ कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आगामी काळात प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत, असे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले.

पावसाळापूर्व कामांसाठी पुन्हा जोरबैठका

पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, आज पावसाळापूर्व कामांबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर, प्रत्यक्ष पावसाळा सुरू होईपर्यंत पुन्हा आढावा बैठका घेण्याबाबत सूतोवाच केले. मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठीची सर्व ती खबरदारी घेण्याचे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.


हेही वाचा : ठाण्यात ‘एच३एन२’ विषाणूचा प्रसार, १५ दिवसांत २५ रुग्णांची नोंद ; पालिकेकडून सतर्कतेचे निर्देश


 

First Published on: March 31, 2023 8:34 PM
Exit mobile version