शशिकांत वारिशे यांची हत्येचा निषेध; मुंबई, पुण्यासह राज्यभरात पत्रकारांची निदर्शने

शशिकांत वारिशे यांची हत्येचा निषेध; मुंबई, पुण्यासह राज्यभरात पत्रकारांची निदर्शने

मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्त्या आणि राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले याचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मुंबईतील प्रमुख पत्रकार संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार आज, शुक्रवारी मुंबईसह राज्यभर पत्रकारांनी निदर्शने केली. तसेच तहसिलदार तसेच कलेक्टर यांना पत्रकारांनी यासंदर्भात निवेदनही दिले.

काळ्या फिती लावून तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी केलेल्या आंदोलनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून राज्यातील 354 तालुक्यांत आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केला आहे. मुंबईतील सर्व पत्रकार संघटनांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काळया फिती लावून आंदोलन केले.

गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांना निवेदन देताना पत्रकार संघटनांचे पदाधिकारी

रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांना गाडीखाली चिरडून ठार करण्यात आले. दलाल पंढरीनाथ आंबेरकर यानेही निर्घृण हत्या केली. त्याची संतप्त प्रतिक्रिया राज्यभर उमटली. या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदेची काल, गुरुवारी तातडीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या या हल्ल्याच्या संदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करावे असा निर्णय घेतला गेला.

सुसंस्कृत महाराष्ट्रात निर्भिड पत्रकारांचा आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केला जातो; पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो; पत्रकार संरक्षण कायदा असला तरी या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते, त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी काळ्या फिती लावून पत्रकारांनी निदर्शने केली. यानिमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन एकजुटीचे दर्शन घडविले.

हेही वाचा – …अजून पोरकटपणा, हळूहळू मॅच्युरिटी येईल; प्रणिती शिंदेंची रोहित पवारांवर खोचक टीका

First Published on: February 10, 2023 7:32 PM
Exit mobile version