“जिंकून येणाऱ्याला जागा देणं महत्त्वाचं..”; मविआतील जागावाटपावर काँग्रेसची स्पष्ट भूमिका

“जिंकून येणाऱ्याला जागा देणं महत्त्वाचं..”; मविआतील जागावाटपावर काँग्रेसची स्पष्ट भूमिका

कर्नाटकातील विजयामुळे काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा सर्व राज्यात बैठकांना सुरुवात केली आहे. तर महाराष्ट्रातही काँग्रेसचे नेते आणि पदाधिरापी हे पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या कार्यालयात आज (ता. 23 मे) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तर या बैठकीत काँग्रेसकडून जागावाटपांवर चर्चा करण्यात आली, ज्यानंतर प्रसार माध्यमांसमोर येऊन नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. ज्या उमेदवारामुळे ती जागा जिंकता येऊ शकते, अशा व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी, असे मत यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. (Congress has a clear stand on seat allocation in MVA)

हेही वाचा – बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत लढा सुरूच राहणार, विनेश फोगाटचा निर्धार

काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बैठकीत झालेल्या मुद्द्यांबाबत माहिती देताना सांगितले की, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील आजी-माजी खासदार-आमदार यांना बोलावून राज्यातील प्रत्येक जागेवर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मविआकडून तयार करण्यात आलेल्या तीन-तीन सदस्यांच्या समितीसमोर जाऊन याबाबतचा अहवाल देण्यात येईल. तसेच, महाराष्ट्रात भाजपला परास्थ करणं, मेरीटच्या आधारावर निर्णय होण ही आमची भूमिका आहे. त्यामुळे सगळ्या जागेची चर्चा येणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत व्हावी, ही अपेक्षा असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

तसेच, जागा कोणाला जास्त मिळतात? कमी मिळतात याबाबत चर्चा नाही तर जो जिंकून येऊ शकेल. त्या पद्धतीची तयारी करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. महाराष्ट्रातील शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराला संपवण्याचा घाट संविधानिक पदावर बसलेले त्यावेळचे राज्यपाल किंवा मंत्री असतील यांनी महाराष्ट्रातील महापुरूषांचा अपमान करण्याचा वारंवार प्रयत्न केला. ज्यामुळे महाराष्ट्रातून भाजपला सत्तेतून बाहेर काढणं ही काँग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

उद्धव ठाकरेंची ताकद नाही, असे म्हणणे चुकीचे…
महाविकास आघाडीमध्ये सध्या लहान भाऊ, मोठा भाऊ असा वाद सुरू आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पडदा टाकला. तर मेरीटच्या आधारावर जागा वाटप होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण उद्धव ठाकरे यांची ताकद नाही, असे म्हणण्याचे कारण नाही. सगळ्यांची ताकद आपापल्या लेवलवर असते. त्यामुळे सामुहिक चर्चा करून या जागावाटपाबाबत निर्णय केला जाईल, असेही नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले.

First Published on: May 23, 2023 2:50 PM
Exit mobile version