वाझे आणि बदल्या प्रकरणामुळे काँग्रेसची अवस्था ‘खाया पिया कुछ नही और गिलास तोडा बारा आणा’

गेल्या काही महिन्यांपासून विविध घटनांमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुरत ढवळून निघालं आहे. त्यातच आता वाझे आणि बदल्या प्रकरण आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे महाविकास आघाडी सरकारची देशभरात पुरती नाचक्की होत आहे. यामुळे या सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली असून ‘खाया पिया कुछ नही और गिलास तोडा बारा आणा’ अशी आमची परिस्थिती झाल्याचे काँग्रेसचेच नेते बोलत आहेत. तशातच महाराष्ट्रात सुरू असलेल्या या चिखलफेकीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही नाराज असून यासंदर्भातील अहवालचं त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून मागवला आहे. यासंदर्भात मुंबईत काँगेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीच्या अहवालानंतरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर अधिक आक्रमक झालेल्या भाजपकडून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केलं जातं आहे. त्यात काँग्रेसची गोची होताना दिसत आहे. लेटरबॉम्बमुळे अडचणीत आलेल्या गृहमंत्री अमित देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीही आक्रमक झाली असून भाजप विरुद्ध या दोन्ही पक्षांनी रणशिंग फुंकल्याचे चित्र आहे. पण याचदरम्यान काँग्रेसचे काही नेत्यांमध्येही मतांतरे असल्याचे समोर येत आहे. तर काही काँग्रेस नेते भाजपची री ओढत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असे म्हणताना दिसत आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते याप्रकरणावर सावध भूमिका घेताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी रविवारी राज्यातील नेत्यांना निर्देशही दिले आहेत. यामुळे काँग्रेस नक्की काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

First Published on: March 23, 2021 2:26 PM
Exit mobile version