काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर यापूर्वीही झाला होता हल्ला, नेमकं काय घडलं?

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर यापूर्वीही झाला होता हल्ला, नेमकं काय घडलं?

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा या गावात दौऱ्यावर असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी पकडलेल्या हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीत त्यांनी हा हल्ला मी स्वतःहून केलेला नसून मला तो करायला लावला आहे, अशी कबुली दिल्याचे प्रज्ञा सातव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. त्यापाठोपाठ आता आमदार प्रज्ञा सातव यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल झालेला हल्ला हा दुसऱ्यांदा झालाय. याचा खुलासा स्वतः आमदार प्रज्ञा सातव यांनी केलाय. याबद्दल बोलताना प्रज्ञा सातव म्हणाल्या की, “नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आम्ही भारत जोडो यात्रेत तयारी करत होतो, तेव्हा पेडगाव या गावातही भर दुपारी ४ वाजता माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. पण तेव्हा आम्ही सिरियसली घेतलं नाही. पण काल कसबा धावंडा या गावीदेखील तसाच प्रकार झाला. त्यामुळे आपण शांत बसलं नाही पाहिजे, असं वाटलं म्हणून मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. लग दुसरी घटना घडल्यानंतर आम्ही पोलिसात तक्रार द्यायचा निर्णय घेतल्याचं सातव यांनी सांगितलं.

या हल्ल्या प्रकरणी पोलीस तपासाबाबत असमाधानी असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय. या हल्ला प्रकरणात आरोपीने स्वतःहून हल्ला केला नाही, त्याला करायला सांगितला होता, पण कोणी करायला सांगितला हे तो सांगत नसल्याने प्रज्ञा सातव यांनी पोलीस तपासावर समाधानी नसल्याचं सांगितलं. हल्ला कुणी करायला सांगितला त्याचं नाव सांगण्यास तो आरोपी घाबरत आहे. या हल्लामागील सूत्रधाराचे नाव समोर येत नाही; तोपर्यंत आम्ही समाधान व्यक्त करू शकत नाही, असेही सातव यांनी नमूद केले.

प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की. “आज कसबे धवंडा गाव कळमनुरी येथे माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला .मला जखमी करण्याचा हा गंभीर प्रयत्न होता आणि माझ्या जीवाला धोका आहे. महिला आमदारांवर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. समोरून लढा भ्याड होऊ नका.”

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला हे हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तुमचाही असाच आरोप आहे का, असा सवाल केला असता प्रज्ञा सातव म्हणाल्या की, ‘ आम्ही आमच्या पक्षाचं काम ताकतीने करत असतो. रोज ३-४ गावांत फिरतो. जनतेचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करत असतो. आमच्या दौऱ्यांमधून पक्षाची ताकद वाढताना दिसतेय. हे दौरे थांबवले पाहिजेत. महिला आहे, घाबरवून घरी बसवलं पाहिजे, असा अजेंडा असू शकतो. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं माझं वैमनस्य नव्हतं.मी त्याला ओळखतही नव्हते, तरीही यामागचं नेमकं कारण काय आहे, ते समोर आलेलं नाही, असं वक्तव्य प्रज्ञा सातव यांनी केलंय.

First Published on: February 9, 2023 3:07 PM
Exit mobile version