‘शेतकऱ्यांना मदत द्या’, काँग्रेस शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘शेतकऱ्यांना मदत द्या’, काँग्रेस शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अवकाळी पावसामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग म्हणजेच कोकण विभागात सरासरी ७० टक्के भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर काही भागात ९० टक्के नुकसान आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयातील यावर्षी सरासरी ४६०० मिमी पाऊस झाला आहे. या वर्षी दोन्ही जिल्ह्यातील ४२०० हेक्टरवर भात लागवड करण्यात आली. मात्र या ठिकाणी सरासरी ५५०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरच्या चौथ्या आठवडयातील सर्वाधिक आर्द्रता ९५ टक्क्यांहून अधिक नोंदवली गेली. मात्र ओला दुष्काळ जाहीर होऊनही अद्याप मदत प्राप्त झालेली नाही. भात पिक लागवडीस प्रत्यक्ष खर्च ७९२ प्रती गुंठा एवढा येतो. प्रतीगुंठयाला सरासरी ६२ किलो भात पिकतो. १० किलो भातापासून सरासरी ६ किलो तांदूळ मिळतो. भाताचा सरकारी दर हा १८५० प्रती क्विंटल आहे. उत्पादित केलेला माल बाजारात विकल्यास गुंठ्याला सरासरी ११४७ रूपये शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे भात उत्पादक गुंठ्याला किमान ६०० रूपये नुकसान भरपाई क्षेत्राप्रमाणे देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कर्जाची परतफेड कशी करणार?

प्रधानमंत्री पीक विमा योजना बँक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सक्तीची आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सदर विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर ४३ हजार ५०० एवढी आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या ७० ते ९० टक्के धान्य खराब झाले असेल, तर शेतकऱ्यांसाठी कर्जाची परतफेड केवळ आणि केवळ अशक्य आहे. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. २ हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात निर्णय घेताना कोकणावर नेहमीच अन्याय झाला आहे. त्यामुळे आपले सरकार कोकणासंबधात विशेष लक्ष देईल याकडेही काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

First Published on: December 1, 2019 8:44 PM
Exit mobile version