आयुष्मान भारत,महात्मा फुले योजनेची एकत्रितपणे होणार अंमलबजावणी

आयुष्मान भारत,महात्मा फुले योजनेची एकत्रितपणे होणार अंमलबजावणी

आयुष्मान भारत योजना

केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना आणि राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही योजनांमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी त्यांची एकत्रितपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. या दोन्ही योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करुन त्या अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, या दोन्ही योजनांमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी मदत होणार असल्याचं या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, यासाठी अंदाजित २३०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचं डॉ. शिंदे यांनी सांगितलं.

रुग्णांच्या कुटुंबियांचा वैद्यकीय उपचारांवरील खर्चाचा भार कमी व्हावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा रुग्णांना बऱ्यापैकी फायदा होत असून २.२३ कोटी कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजना खासगी, पालिका तसेच शासकीय रुग्णालयांमध्येही राबवल्या जातात. पण, तेवढ्या प्रमाणात जनजागृती नसल्याकारणाने अनेक जण उपचारांपासून वंचित राहतात.

महाराष्ट्रात एकूण अंदाजे २.५ कोटी कुटुंब आहेत. त्यापैकी आतापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले या योजनेचे लाभार्थी २.२३ कोटी एवढे आहेत. तर, आयुष्मान भारत या योजनेचे लाभार्थी ८३ लाख कुटुंब आहेत. ज्यांच्याकडे केशरी, पिवळं ही रेशन कार्ड असतील त्या सर्व कुटुंबांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेअंतर्गत बहुतेक आजारांवरील दिड लाखापर्यंतचे प्रत्येक उपचार मोफत दिले जातात.

याविषयी अधिक माहिती देताना या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितलं की, ” या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीसाठी १५ जानेवारी या दिवशी कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दोन्ही योजनांच्या उपचार पद्धतींची सांगड घालून योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे आणि त्या अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढावी या संदर्भात मंत्रिमंडळाने निर्देश दिले आहेत. आतापर्यंत महात्मा फुले या योजनेअंतर्गत ९७१ आजारांवर लाभ घेता येत होता, आता १२०९ आजारांवरील उपचार घेता येणार आहेत. ”

या टोल फ्रि नंबरवर मिळेल माहिती –

कोणत्याही उपचारांसाठी किंवा शस्त्रक्रियेच्या खर्चाबाबत, रुग्णालयांबाबत माहिती हवी असल्यास १५५३८८ या नंबरवर संपर्क केल्यास माहिती मिळू शकते. २४ तास ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारची माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. शिवाय, मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्णांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयांमध्ये येण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे रुग्णांना जास्तीत जास्त या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहनही डॉ. शिंदे यांनी केलं आहे.

गुडघे व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधा 

आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत गुडघे व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध होणार आहे. दररोज किमान १६०० लोकांना या योजनेचा फायदा होत आहे. शिवाय, या अंतर्गत आतापर्यंत ४९२ रुग्णालयांचा समावेश होता आता ती संख्या वाढून ८०० करण्यात येणार आहे.

First Published on: February 14, 2019 10:51 PM
Exit mobile version