दिलासादायक ! राज्यात कोरोना रुग्ण घटले

दिलासादायक ! राज्यात कोरोना रुग्ण घटले

corona

राज्यामध्ये सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून मात्र रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. रविवारी राज्यातील रुग्ण संख्या 40 हजारांपर्यंत पोहोचली असताना त्यात घट होऊन सोमवारी 31 हजार 643 वर आली तर मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार 918 वर पोहोचली. सलग दोन दिवसांमध्ये राज्यातील रुग्णसंख्येत 12 हजारांनी घटल्याने राज्यामध्ये दिलासादायक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.

मार्चच्या सुरुवातीपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मार्चच्या सुरुवातीला पाच ते सहा हजारांच्या घरात असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने राज्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. तर काही दिवसांपासून 35 हजारांच्या घरात असलेली रूग्णसंख्या रविवारी थेट 40 हजारांवर पोहोचल्याने राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या घट झाली. राज्यामध्ये रविवारी 40,414 रुग्णांची नोंद झाली होती. तर सोमवारी 31 हजार 643 तर मंगळवारी 27 हजार 918 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीला झालेल्या कोरोनाच्या विस्फोटानंतर 12 हजाराने रुग्णसंख्या घटल्याने कोरोना रुग्णसंख्येबाबत थोडेसे दिलासादायक वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७,७३,४३६ झाली असून, ३,४०,५४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी २३,८२० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून, राज्यात आजपर्यंत एकूण २३,७७,१२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ टक्क्यांवर आले असले तरी रविवारच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट झाले आहे. रविवारी राज्यामध्ये 40 हजार रुग्ण आढळले असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.58 टक्के इतके होते. राज्यात मंगळवारी १३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९६,२५,०६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,७३,४३६ (१४.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १७,६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील आठ जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना संसर्ग

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर,

देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण मोहिमेबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी माहिती दिली. देशात प्रामुख्याने १० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बेंगळुरू शहर यांचा यात समावेश आहे. आठवड्याचा राष्ट्रीय सरासरीचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.६५ टक्के आहे. यात महाराष्ट्राची आठवड्याची सरासरी २३ टक्के आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.

घरोघरी लसीकरणाबाबत कुठलीही मागणी नाही
घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून अशा प्रकारची अद्याप कुठलीही मागणी करण्यात आलेली नाही. देशात आपण युनिव्हर्सल लसीकरण करतो. पण तिथेही आपण घरोघरी जाऊन लसीकरण करत नाही, असे भूषण यांनी सांगितले.

First Published on: March 31, 2021 6:30 AM
Exit mobile version