पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत!

पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत!

देशभरात लसीकरणाची तयारी सुरू असून, शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी फक्त दिल्लीतच नाही, तर देशभरात कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत सुखद धक्का दिला होता. केंद्राकडून झालेल्या या घोषणेचे स्वागत होत असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी पुढच्याच क्षणी घुमजाव केले. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल खुलासा केला.

कोरोनाची लस सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. देशात पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस मिळेल. मात्र, त्यानंतर २७ कोटी लोकांना निःशुल्क लस देण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमधील २५९ ठिकाणी ड्राय रन सुरू केले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात जाऊन याबाबत आढावा देखील घेतला.

नववर्षाच्या सुरुवातीलाच शुक्रवारी ऑक्सफर्डची लस तातडीच्या वापरासाठी मिळण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. लसीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड लसीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचे सांगितले आहे.

लसीकरणासाठी राज्य सज्ज चार जिल्ह्यांमध्ये यशस्वी ड्रायरन

कोरोना लसीकरणाचा ड्रायरन शनिवारी संपूर्ण देशात घेण्यात आला. ड्रायरनसाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून, जालना, पुणे, नंदुरबार आणि नागपूर या चार जिल्ह्यांमध्ये शनिवारी यशस्वी ड्रायरन झाले. लस तयार करणार्‍या आठ कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी तिसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. लसीकरणाला केंद्र शासनाने परवानगी दिल्यास प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. लसीकरणासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी सज्ज असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.

लसीकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होते का, तसेच लसीकरणामध्ये येणार्‍या अडचणी, संभाव्य चुकांची प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा ड्रायरन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या लसीकरणासाठी मतदान केंद्राप्रमाणे बुथची स्थापना करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रावर तीन कक्ष असतील. पहिल्या कक्षात लसीकरणासाठी येणार्‍या व्यक्तीची ओळख पटवली जाईल तर दुसर्‍या कक्षात त्या व्यक्तीला लस टोचण्यात येईल. तिसर्‍या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

लस उपलब्ध होताच ती 24 तासांत मुंबईकरांना मिळणार

 कोरोनाला रोखण्यासाठी ज्यावेळी कोरोनावरील लस मुंबईत उपलब्ध होईल, त्याच्या २४ तासांतच लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. आतापर्यंत २५०० कर्मचार्‍यांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून आणखीन १० हजार कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. देशभरात कोरोनासंबंधित ड्राय रन सुरू आहे. तसेच, राज्यात पुणे, नागपूर आदी चार जिल्ह्यातही ड्राय रन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी कोरोना लसीकरण केंद्रांचा आढावा घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मुंबईत केईएम, सायन, नायर, राजावाडी, वांद्रे भाभा, डॉ. आंबेडकर रुग्णालय, व्ही. एन. देसाई आणि कूपर अशा ८ ठिकाणी लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तसेच, ४ मेडिकल हॉस्पिटलमध्ये सुविधा केली आहे. आज मी या लसीकरण केंद्रांची पाहणी केली आहे. त्याठिकाणी कशाप्रकारे लसीकरण तयारी सुरू आहे, काय अडचणी आहेत, याबाबतची माहिती जाणून घेतली. ड्राय रनचा आढावा घेतला, असे काकाणी यांनी सांगितले. तसेच, पालिकेने लसीकरणाबाबत २५०० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. आणखी १० हजार कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

कांजूरमार्ग येथील कोल्डस्टोरेजच्या लसीचा साठा ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी या ठिकाणी युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू आहे. कांजूरमार्ग येथील लस साठवणूक करण्यात येणारे ठिकाण हे मध्यवर्ती कोल्डस्टोरेज आहे. येथून शहर व पश्चिम उपनगरात आवश्यक लसीचा साठा पाठवणे सुलभ होणार आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये १ कोटी लसींचा साठा साठवता येणार आहे. त्याचप्रमाणे शहर भागातील एफ/ दक्षिण भागात लस साठवणूक केंद्रात १० लाख लसींचा साठा साठवता येणार आहे. आतापर्यंत २ लाख नागरिकांचा डेटा जमा करण्यात आला असून तो अपलोड करण्यात आला आहे. लस आल्यावर पहिल्यांदा सव्वा लाख आरोग्य कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

‘कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, असे मी देशातील नागरिकांना आवाहन करतो. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमतेची तपासणी करणे, याला आमचे प्राधान्य आहे. दरम्यान, पोलिओ लसीकरणाच्या वेळी अनेक अफवा पसरल्या होत्या. पण लोकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पोलिओची लस घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला.’

First Published on: January 3, 2021 7:05 AM
Exit mobile version