पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ‘पोस्टमोर्टम’ न करताच उरकले अंत्यसंस्कार

पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ‘पोस्टमोर्टम’ न करताच उरकले अंत्यसंस्कार

अहमदनगर : बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे मृत पावलेल्या विवाहित मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अंत्यसंस्कार केल्याने मुलीचे वडील, गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व मुख्य आरोपीवर भा.द.वी.कलम 304 नुसार कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले.

यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी, शहानवाज शेख, निलेश सातपुते, विजय मिसाळ, दत्ता पाटील, गौतमीताई भिंगारदिवे, वैशाली नराळ, आरती शेलार, मीरा गवळी, चंद्रकला रच्चा, राहुल शिवशरण, सोहेल शेख, संतोष डमाले आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की 31 जानेवारी 2023 रोजी मौजे रुईछत्तीशी ता.नगर येथे ज्ञानेश्वर निवृत्ती पवार या बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे शंकर फुलमाळी यांच्या 19 वर्षीय मुलीचा बाळंतपणात मृत्यू झाला ही घटना गावासह संपूर्ण नगर तालुक्यात वार्‍याप्रमाणे पसरली. त्यामुळे या घटनेस जबाबदारी असणार्‍या बोगस डॉक्टर ज्ञानेश्वर निवृत्ती पवार याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली.

ज्ञानेश्वर निवृत्ती पवार यांच्या डी बी बोस या रुग्णालयास 20 ते 25 वर्षापासून कुठल्या नियमानानुसार औषध पुरवठा होत आहे याची चौकशी होऊन संबंधित मेडिकल एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या दवाखान्यासाठी काम करणार्‍या वैद्यकीय तपासणी करणारे लॅब चालकावर देखील कारवाई केलेली नसून, अश्या बोगस डॉक्टरांच्या उपचाराने एका महिलेचा मृत्यू होऊन देखील संबंधित बोगस डॉक्टर मेडिकल एजन्सी व वैद्यकीय तपासणी लॅब यांच्यावर मृत्यूस कारणीभूत म्हणून भा.द.वी. कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावे शव विच्छेदन न करता,पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने करण्यात आल्याने सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी व मुलीचे वडील यांच्यावर भादवि कलम 201 नुसार गुन्हे दाखल होऊन संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी व मयत मुलीस न्याय मिळावा अन्यथा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने 13 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

First Published on: February 9, 2023 12:43 PM
Exit mobile version