पळसाची पाने झाली गायब…

पळसाची पाने झाली गायब…

जंगलात रानावनात डोंगर कपारीत राहणार्‍या आदिवासी समाजाने आपल्या दोन वेळच्या घासासाठी जंगलात भटकंती करताना रोजगाराच्या वाटा या स्वतः शोधल्या आहेत. सरकारी मदतीची वाट न पाहता जगण्यासाठीचा हा संघर्ष आदिवासींचा कायम दिसतो आहे. कशासाठी तर वितभर पोटासाठी प्रत्येक मोसमात त्याने वेगवेगळे व्यवसाय करून काबाडकष्ट करून दोन पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविला आहे. परंतु त्यांच्या या हक्काच्या व्यवसायांवर यंदा करोनाच्या महामारीने अक्षरशः वरवंटा फिरविला आहे. करोनातील लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद आहेत. शहरांतील बाजारपेठा बंद पडल्या परिणामी तब्बल दोन महिने आदिवासींना पळसाची पाने मुंबईत विक्रीसाठी नेता आली नाहीत. पळसाच्या पानांच्या विक्रीचा हा हक्काचा व्यवसाय हा पूर्णतः करोनाने ठप्प केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड , खडावली, वासिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, उंबरमाळी, खर्डी, कसारा या ग्रामीण भागातील आदिवासी बहुल वस्त्यावरील आदिवासी हे दरवर्षी पळसाची पाने विक्रीचा व्यवसाय करतात. जवळपास या व्यवसायातून आदिवासी समाजाची दहा हजारपेक्षा अधिक कुटुंब आपली रोजीरोटी चालवितात. दाट जंगलात, डोंगर कपारीत भटकंती करून आदिवासी पुरुष, महिलाही पळसाची पाने मोठ्या मेहनतीने खुडून आणतात. नंतर या पानांचे गठ्ठे बांधून ते जंगलातून डोक्यावर वाहून रेल्वे स्थानकात आणून रेल्वेने पुढे मुंबई, दादर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरातील फुलमंडईत विक्रीसाठी नेतात. फुले बांधण्यासाठी पळसाच्या पानांना फुल मंडईत मोठी मागणी असते. पळसाच्या पानाच्या विक्रीतून त्यांना रोज ४०० ते ५०० रुपयांची कमाई होते. असे या व्यवसायातील सुकरी निरगुुडा या आदिवासी महिलेने माहिती देताना सांगितले. काही आदिवासी हे पळसाची पानं ही उत्तर भारतीय लोकांना रेल्वे स्थानकातच विक्री करतात. यातून स्थानिक आदिवासींना दोन पैसे मिळतात. परंतु यंदा करोनाने हा हक्काचा रोजगार हिरावला आहे. यामुळे पळसाच्या पानांच्या विक्रीचा पिढीजात व्यवसाय करणारी आदिवासी कुटुंबे कमालीची धास्तावली आहेत. लॉकडाऊन असाच वाढत राहिला तर आम्ही पळसाच्या पानांंच्या विक्रीचा व्यवसाय करायचा तरी कसा आणि आमचे पोट भरायचे तरी कसे या चिंतेत आदिवासी आहेत.

बांबूपासून बनविलेल्या वस्तू विक्रीअभावी पडून
आदिवासी बांबूपासून मोठ्या कौशल्याने टोपल्या,सूप, इरणा,चाप,कनगा आदी वस्तू बनवितात. या सर्व वस्तू साधारण पावसाळा मोसमाच्या अगोदर उन्हाळ्याच्या अखेरीला शहरांतील आठवडी बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. यातून त्यांना दररोज ३००ते ४०० रुपयांची कमाई होते. परंतु यंदा करोना महामारीमुळे त्यांच्या बांबू हस्तकलेच्या व्यवसायाला देखील घरघर लागली असून लॉकडाऊनमुळे आदिवासी या वस्तू विक्री करू शकलेला नाही. या सर्व बांबूच्या वस्तू यंदा तशाच पडून राहिल्याने आदिवासींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

First Published on: May 16, 2020 6:50 AM
Exit mobile version