Cyclone Tauktae: ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन दोषींना शिक्षा द्या, नवाब मलिक यांची मागणी

Cyclone Tauktae: ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन दोषींना शिक्षा द्या, नवाब मलिक यांची मागणी

तौक्ते चक्रीवादळाची सूचना मिळूनही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला त्यामुळे ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन जो कोणी दोषी असेल त्यांना जबाबदार ठरवून शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. तौक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ONGC ने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? असा सवालही बुधवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता.

तौक्ते चक्रीवादळाचा धोका असल्याचे सरकार व संबंधित यंत्रणांनी अलर्ट दिलेला असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष केला. ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यातील एक बार्ज बुडुन ३७ कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही ४० कामगार बेपत्ता झालेले आहेत. अक्षरशः शेकडो कामगार मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना भारतीय नौदलाने व तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या सर्व घटनेला ओएनजीसी जबाबदार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान काल बुधवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर रात्री धर्मेद्र प्रधान चौकशी समिती नेमत आहेत. या चौकशी समितीने काही होणार नाही. जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

ONGC ने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केले?

प्रत्येकाला तोक्ते चक्रीवादळाबद्दल अवगत करण्यात आले होते आणि सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे इशाराही देण्यात आला होता. स्थानिक सरकारी एजन्सींनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली होती आणि मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका असे सांगण्यात आले होते मग ONGC ने सर्व चेतावणींकडे दुर्लक्ष का केले आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांना बार्जमधून बाहेर का काढले नाही आणि किनार्‍यावर आणले नाही. त्यामुळेच ६० निरपराध कामगारांचे जीव धोक्यात आले. या दुर्लक्षामुळे ६० लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि बर्‍याच जणांनी आपला जीव गमावला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

First Published on: May 20, 2021 2:41 PM
Exit mobile version