Cyclone Tauktae:कोकणातील फळझाडांचे शास्त्रोक्त पुनरुज्जीवन करा,आशीष शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Cyclone Tauktae:कोकणातील फळझाडांचे शास्त्रोक्त  पुनरुज्जीवन करा,आशीष शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चक्रीवादळामुळे कोकणपट्टी तसेच सह्याद्रीच्या पट्टयात फळ बागांचे विशेषतः आंबा, नारळ केळी आदी झाडांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बागायतदार शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून उन्मळून पडलेली झाडे त्याच ठिकाणी शास्त्रोक्त प्रयत्नाने उभी करण्याबाबत राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

गेली दोन दशके मुंबईतच नव्हे तर जगभरच्या वृक्ष लागवडीच्या आणि त्यानंतर घडणाऱ्या वादळाच्या नुकसान दुरुस्तीची एक पद्धत उपलब्ध आहे. त्या तंत्रज्ञानाद्वारे उन्मळून पडलेल्या झाडांची मुळे स्वच्छ करून आणि झाडांची तुटलेल्या फांद्या तसेच पाने यांची योग्य ती छाटणी करून ती झाडे पुन्हा उभी करता येतात, याकडे शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

हे तंत्रज्ञान वापरताना कृषी विद्यापीठतील आणि मुंबई पालिकेतील उद्यान विभागाच्या तज्ञांना प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक दाखवावे लागेल. आणि त्यानंतर त्याला आवश्यक असलेले फोर्स लिफ्टस आणि क्रेन या तातडीने तिथे हलवून ते काम तीन ते सात दिवसात वादळ थांबल्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे. याद्वारे आंबा, नारळ, काजू व इत्यादी अनेक फळ झाडांना आपण पुनर्जीवित करू शकू, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.

आज प्रत्येक झाडाला उभे करण्याचा खर्चाचा अंदाज देणे कठीण आहे.पण अवघ्या तीन ते पाच हजार रुपयात जे झाड शेतकऱ्यांना पुन्हा फळ देणारे ठरेल. तसेच हे काम शेतकऱ्यांना मानसिकदृष्टया शक्ती देण्यासारखे ठरेल. म्हणून यासाठी तात्काळ टास्क फोर्स निर्माण करण्यात यावी. ज्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ, मुंबईतील खासगी संस्था आणि मुंबई महानगरपालिकेचा समावेश असावा. या गटाने जागोजाग प्रात्यक्षिक केली तर १५ दिवसामध्ये शेतकरी उत्साहाने कामाला लागेल. त्यामुळे तज्ज्ञ समितीची स्थापना करून या कार्यास तीन दिवसाच्या आत मार्गी लावावे, अशी विनंती आशीष शेलार यांनी केली आहे.


हेही वाचा – Cyclone Tauktae: राज्यात तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

First Published on: May 17, 2021 9:18 PM
Exit mobile version