सप्तशृंग गडावर ड्रेस कोडबाबत कार्यकारिणीच्या बैठकीनंतर निर्णय

सप्तशृंग गडावर ड्रेस कोडबाबत कार्यकारिणीच्या बैठकीनंतर निर्णय

नाशिक : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तसेच पर्यटन स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर वर्षभरात लाखो भाविक हे श्री भगवती चरणी नतमस्तक होत असतात. गेल्या काही दिवसांपासून मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेसकोडचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात सुद्धा ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सप्तशृंगी मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा, त्यासाठी विश्वस्त मंडळातील सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भाविक सकारात्मक असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने सध्या सदर विषयाबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नसून, भविष्यकाळात धार्मिक प्रक्रियेतील पावित्र्य व आस्था अबाधित ठेवणेकामी विश्वस्त मंडळ प्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ, भाविक मंडळ आदीच्या सहभागातून योग्य ते अभिप्राय प्राप्त करून विश्वस्त कार्यकारिणी सभेतील प्राप्त होणारे अंतिम मार्गदर्शन व ठरावाप्रमाणे योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे नियोजन होणे नक्कीच क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्र राज्य मंदिर परिषदेने राज्यातील विविध मंदिरांसाठी वस्त्रसंहिता कार्यान्वित करण्याबाबतचा निर्णय घेतला असला तरी अद्याप सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय घेतलेला नसल्याची माहिती ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी संगितले.

सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य मंदिर परिषदेने राज्यातील विविध मंदिरासाठी वस्त्रसंहिता कार्यान्वित करणेबाबत निर्णय घेतला असून विविध राज्याच्या भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरेने नटलेला आपला देश आहे. विविध राज्यांची परंपरा, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक रितीरिवाज तसेच वेशभूषा व धार्मिक वस्त्रसंहिता आदी भिन्न आहेत. पर्यायी देशातील सर्व राज्यांतील विविध परंपरा, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यातील वस्त्र परिधान करण्याच्या पद्धतींचा व वस्त्रांचा सहभाग मंदिर परिषदेने घेतलेल्या निर्णयात प्रतिकूल असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मंदिर परिषदेने पाश्चात्य संस्कृतीतील वस्त्र किंवा गणवेश पद्धतीला मंदिरात प्रवेश नाकारण्याचा जाहीर केलेला निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे. पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेले काही भाविक येतांना तोकडे कपडे घालून येतात. असे असले तरी सप्तशृंगगडावर भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ भाविक सकारात्मक आहेत. गडावर राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणार्‍यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्ण्याची मागणी होत आहे.

भाविकांना आता पूर्ण पेहरावात आल्यावरच सप्तशृंगी देवीचे दर्शन घेता येईल. असा विचार श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या चर्चेत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरती आणि पूजेच्या कालावधीत आलेल्या आणि नोंदणी केलेल्या भाविकांना गाभार्‍यात दर्शन घेता येणार असून पुरुषांना सोवळे तर महिलांना साडी नेसून आरतीनंतर दर्शन घेता येणार असल्याचे सांगितले. मंदिर संघाने घेतलेला निर्णय व त्यात नमूद केलेल्या वस्त्र संहितेबाबतची तरतूदी तपासून विश्वस्त संस्थेच्या संयुक्तिक सभेत धार्मिक परंपरेला आधारित योग्य तो निर्णय घेवून दर्शन प्रक्रिया राबविली जाईल. तूर्तास विश्वस्त संस्थेचा कोणताही निर्णय झाला नसून, संयुक्तिक सभेत झालेला निर्णय माध्यमांना प्रसंगी कळविला जाईल.’ : अ‍ॅड. दीपक पाटोदकर, विश्वस्त, संस्थान देवी ट्रस्ट

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मी सकारात्मक असून, श्री सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी किंवा कसे, याबाबत अभ्यास करून अध्यक्ष, विश्वस्त मंडळाशी चर्चा करून निर्णय घेऊ. : अ‍ॅड. ललीत निकम, विश्वस्त, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट

वस्त्रसंहिता म्हणजे काय? किंवा कसे? याबाबतचे छायाचित्रासहित माहीत होणे किंवा त्याबाबत दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून भाविकांमध्ये प्रबोधन होणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जेणे करून भाविकांमध्ये होत असलेला संभ्रम टाळता येईल. : सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, श्री सप्तशृंग देवी ट्रस्ट

मंदिरात आपण दर्शनासाठी जातो, त्यामुळे तेथील पावित्र्य राखले गेले पाहिजे. गडावरही अशोभनीय व तोकडे कपडे घालून भाविक येत असल्याने मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली पाहिजे, अशी ग्रामपंचायतीची भूमिका असून, त्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. : रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगगड

महाराष्ट्रातील मंदिर संघाने वस्त्रसंहिताबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. तोकडे कपडे घालून मंदिरात जाणार्‍यावर चाप बसणे आवश्यक आहे. श्री भगवतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वस्त्रसंहिता लागू केली, तर स्वागतच करू. : धनेश गायकवाड, ग्रामस्थ, सप्तशृंगगड

First Published on: May 30, 2023 4:13 PM
Exit mobile version