स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी ९० दिवसांत निर्णय!

स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी ९० दिवसांत निर्णय!

मंत्री उदय सामंत

मुंबई विद्यापीठ हे प्रशासकीय दृष्टीने कोकणातील विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली गेली. कोकणाचे स्वतंत्र विद्यापीठ तयार करण्याबाबत ९० दिवसांत विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला सामंत उत्तर देत होते.

कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांना मुंबई सोयीचे असल्याने त्यांना मुंबई विद्यापीठातच राहायचे आहे. यावर, राजकारण करण्याची आवश्यकता नाही. स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला, तरी त्यात रायगडचा समावेश नसेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत तब्बल ८०० महाविद्यालये आणि आठ लाख विद्यार्थी असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. तसेच, मुंबईहून दूर असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी तर मुंबई गैरसोयीचे आहे. डावखरे यांच्यासह विरोधकांनी कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली.

‘मुंबई विद्यापीठाची बदनाम करु नका’

मुंबई विद्यापीठाला गौरवशाली परंपरा आहे. दीडशेहून अधिक वर्षांचा काळ या विद्यापीठाला होऊन गेला आहे. अनेक महापुरुषांनी याच विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे आम्हाला मुंबई विद्यापीठापासून वेगळे व्हायचे नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे म्हणाले. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र सक्षमीकरणाची मागणी आमदारांनी केली. यावर, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी आणि ठाणे उपकेंद्रांना सक्षम केले जाईल. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपकेंद्र स्थापन करून येत्या दोन महिन्यांत सर्व उपकेंद्रांवर संचालक नेमण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.


हेही वाचा – आरोग्य विभागात विशेषज्ञांची पदे तीन महिन्यात भरणार!

दरम्यान, स्वतंत्र कोकण विद्यापीठासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही महाविद्यालयांनी कोकणाला मुंबई विद्यापीठाशीच संलग्न ठेवावे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे दोन वेगळे मतप्रवाह लक्षात घेता यासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे. यात संस्थाचालक आणि प्राचार्यांचा समावेश असेल. तसेच विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करूनच स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत ९० दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

First Published on: February 28, 2020 6:44 PM
Exit mobile version