आरोग्य केंद्राच्या प्रवेशव्दारातच प्रसूती; डॉक्टर, आरोग्यसेविका नव्हते हजर

आरोग्य केंद्राच्या प्रवेशव्दारातच प्रसूती; डॉक्टर, आरोग्यसेविका नव्हते हजर

अहमदनगर : डॉक्टर व आरोग्यसेविका वेळेवर उपस्थित न झाल्यामुळे नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटसमोरच महिलेची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत या पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी योजनेलाच राजरोस हरताळ फासला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी या घटनेच्या निषेधार्थ ’प्राथमिक आरोग्य केंद्र विकणे आहे,’ या आशयाचा फलक हाती घेऊन आंदोलन केले.

टाकळी काझी परिसरात वास्तव्यास असलेल्या भटक्या समाजातील एका गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आली. परंतु, आरोग्य केंद्राचे गेट बंद असल्यामुळे ते उघडण्याची प्रतीक्षा करत ती बराच वेळ बाहेर उभी राहिली. पहाटे चार वाजले तरी प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर गर्भवती महिला गेटसमोरच प्रसुत झाली. या आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्यसेविका मुक्कामी नसल्याने गर्भवती महिलेवर अशी परिस्थिती ओढवली. या आरोग्य केंद्राच्या गेटला आतून कुलूप लावलेले असल्यामुळे आत निद्राधीन झालेल्या सुरक्षारक्षकाला महिलेने दिलेला आवाज ऐकायला आला नाही. सुदैवाने बाळ आणि बाळांतीण सुखरुप असले तरी घडलेल्या प्रकाराबाबत आणि आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जगण्यासाठी संघर्ष 

भटका विमुक्त समाज आदिवासी समाजासारखेच जीवन जगतो. त्याच्या सुदैवाने देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती विराजमान झाल्या आहेत. या समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. राहायला जागा नाही. त्यामुळे कायमस्वरुपी निवारा नाही. उत्पन्नाचा कुठलाही शाश्वत स्त्रोत नसल्यामुळे भटकण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यातच पोटचा गोळा जन्माला घालायचा म्हणजे एकप्रकारचा पुनर्जन्मच. त्याचीही शाश्वती नाही, हे या समाजाचे दुर्दैव आहे.

 

First Published on: August 5, 2022 1:03 PM
Exit mobile version