विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण

राज्य सरकारमधील कित्येक मंत्री व विधानसभा अध्यक्षांनंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ते क्वारंटाइन झाले आहेत. ‘माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे. ‘लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः आठ दिवस होम क्वारंटाइन राहणार असल्याचे जाहीर केले होते. ‘मी कोणालाही भेटणार नाही. माझे कार्यालय व कामकाज सुरूच राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. कोणतीही अडचण असल्यास माझे स्वीय सहाय्यक धनराज भट्टड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र आता त्यांना स्वतःला कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर त्यांनी टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

या मंत्र्यांना कोरोनाची लागण

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.


शिर्डी साईसंस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन
First Published on: September 26, 2020 6:11 PM
Exit mobile version