गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

राज्यातील महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार चुकून आलेलं आहे. गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात, तसं हे सरकार आहे, असा जोरदार हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. अनैसर्गिक युतीतून एकत्र आलेले हे लोकं आहेत, असं देखील फडणवीस म्हणाले. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल निधी देत नसल्याची तक्रार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. तसंच, काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी पशूसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “अनैसर्गिक युतीने एकत्रित आलेले हे लोकं आहेत. विचारधारा नाही, शासन नाही. केवळ सत्तेला चिपकलेले अशाप्रकारचे हे लोकं आहेत. ज्याप्रकारे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकतात तशाप्रकारे सत्तेला चिटकलेले तीन पक्ष. त्यामुळे सत्तेचा वाटा जिथे मिळत नाही, त्याठिकाणी अशा प्रकारची ओरड होते. वाटा मिळाल्या बरोबर सगळे बंडोबा थंडोबा होतात,” असं फडणवीस म्हणाले.

ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना दुसरं काय दिसणार

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेनेनं जत्रा अशी टीका केली आहे. यावर देखील फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना दुसरं काय दिसणार, अशी टीका फडणवीस यांनी केली. लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतोय, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

First Published on: August 23, 2021 12:37 PM
Exit mobile version