पीपीई किट्स, जीएसटीबद्दलचे सरकारचे दावे खोटे – देवेंद्र फडणवीस

पीपीई किट्स, जीएसटीबद्दलचे सरकारचे दावे खोटे – देवेंद्र फडणवीस

एकीकडे राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त असल्याचं दिसत आहे. मंगळवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सत्ताधारी महाविकास आघाडीवर कोरोनाविरोधात लढा देण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत अनेक प्रकारची आकडेवारी देऊन आरोप केले. त्यावर आज संध्याकाळी सत्ताधाऱ्यांकडून सविस्तर आकडेवारी देत उत्तर देण्यात आलं. अनिल परब, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तिघा मंत्र्यांनी त्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. मात्र, ही पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा अवघ्या २ तासांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येत यातल्या काही मुद्द्यांना खोडून काढलं आहे.


वाचा सविस्तर – देवेंद्र फडणवीसांनी फक्त आकड्यांचा खेळ केला

काय म्हणाले फडणवीस?

सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘पीपीई किट्स मिळाले नसल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. यासाठी एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यावर कुठल्या राज्याला किती पीपीई किट्स मिळाले, त्याची माहिती मिळते. त्यानुसार २६ मेपर्यंत महाराष्ट्राला १० लाख पीपीई किट्स, १६ लाख एन ९५ मास्क दिले आहेत. सामग्री खरेदी करण्यासाठी ४६४ कोटी रुपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत’, असं फडणवीस म्हणाले. तसेच, ‘डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसचे पैसे ज्या खात्यात जायला हवेत, त्याच खात्यात जातात’, असं देखील फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

मजुरांसाठी चालवल्या जाणाऱ्या रेल्वेसाठी किती खर्च येतो, त्यांच्या तिकिटांचा खर्च कोण करतं? यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्रेन चालवण्यासाठी ५० लाख रुपये खर्च कसा येतो, याचं गणित सांगावं’, असं आव्हान आज सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘रेल्वेला एक ट्रेन चालवण्याकरता ५० लाख रुपये लागतात. आणि राज्य सरकारांना त्या मजुरांच्या तिकिटांचा खर्च ७ ते ८ लाख रुपये येतो. त्या ५० लाख रुपयांचा उल्लेख केला आहे’, असं म्हणाले आहेत. याशिवाय, ‘केंद्र सरकारकडून डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सचे पैसे आले आहेत. जीएसटीचे नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे आले आहेत. डिसेंबर ते मार्चच्या पैशांबद्दल जीएसटी कौन्सिल निर्णय घेत आहे’, हे मी कालच नमूद केलं आहे’, असं देखील फडणवीस म्हणाले.

रुग्णसंख्येवर सत्ताधाऱ्यांनी बोलावं

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीसांनी मुंबई आणि महाराष्ट्रात वेगाने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. ‘मुंबईत टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. आज देशभरात झालेल्या टेस्टपैकी ५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघतात. महाराष्ट्रात १३ टक्के पॉझिटिव्ह निघतात. मुंबईत तर ते ३२ टक्के पॉझिटिव्ह निघतात. देशातले ३३ टक्के रुग्ण आणि ४० टक्के मृत्यू ज्या राज्यात आहेत, त्या राज्याचे मंत्री स्वत:ची पाठ थोपटून घेत आम्ही कसे चांगलं काम करत आहोत, हे सांगतात. अशा पत्रकार परिषदा घेण्याऐवजी मुंबईत लोकांना बेड मिळत नाहीत, टेस्ट होत नाहीत याविषयी सत्ताधाऱ्यांनी सांगायला हवं’, असं फडणवीस म्हणाले.


वाचा सविस्तर – केंद्र सरकार निधी देतंय, राज्य सरकारला बोल्ड निर्णय घ्यावे लागतील-फडणवीस
First Published on: May 27, 2020 7:00 PM
Exit mobile version