शिवरायांच्या भव्य पुतळ्याच्या लोकार्पणासाठी फडणवीस मॉरिशसमध्ये, सोहळ्याचा व्हिडीओही जारी

शिवरायांच्या भव्य पुतळ्याच्या लोकार्पणासाठी फडणवीस मॉरिशसमध्ये, सोहळ्याचा व्हिडीओही जारी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आज मॉरिशसमध्ये अनावरण होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॉरिशसला रवाना झाले आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी फेसबूक आणि ट्वीटरवर सोहळ्याचा व्हिडीओही जारी केला आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज मॉरिशस येथे होणार. समुद्रापार घुमणार शिवगर्जना! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मॉरिशसमध्ये उभारला जातोय. त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचा कार्यक्रम संध्याकाळी पार पडणार आहे. परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन टप्प्यात आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मॉरिशसमधील शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाबाबत परराष्ट्रमंत्री ए.के. गोनू यांनी ८ मार्च २०२३ रोजी फडणवीस यांची भेट घेतली होती. दरम्यान मॉरिशसमध्ये ७५ हजारांहून अधिक मराठी लोक राहतात. यामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकणातील नागरिकांचा समावेश आहे.


हेही वाचा : भाजपला शिंदे सरकारचं नाही तर ठाकरेंचं ओझं मविआला झालंय, नितेश राणेंचा पलटवार


 

First Published on: April 28, 2023 12:01 PM
Exit mobile version