धोका वाढला! विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण

धोका वाढला! विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढायला लागलाय. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झालीय. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. मला कोरोनाची लागण झाली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषधं घेत आहे. सध्या मी विलगीकरणात आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्यांनीसुद्धा कोरोना चाचणी करून घ्यावी, सगळ्यांनी काळजी घ्यावी, असंही देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

खरं तर देवेंद्र फडणवीस हे काल लातूरचा दौरा आटोपून सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांना ताप आल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते. त्यानंतर आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन राहावे लागते, त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार हाच प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळी त्यांनी स्वत:ला वेगळे करून घेतले होते. तेव्हासुद्धा आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकीत भाजपचे प्रभारी होते. तेव्हासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केलीय. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर होताना दिसत आहे. काल राज्यात १ हजार ३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई (Mumbai City) शहरातील असून, मुंबईत काल ८८९ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कालपर्यंत एकूण ७७,३७,९५० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०५ टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सिंहगड किल्ला घाट रस्त्यावर संरक्षक जाळ्या; मान्सूनपूर्व कामांना वेग

राज्यात काल १ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१०,३५,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,९१,७०३ (०९.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात काल एकूण ५८८८ ॲक्टिव्ह रुग्ण होते. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९१,७०३ झाली आहे.

संजय राऊतांकडूनही चिंता व्यक्त

देवेंद्र फडणवीस आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो, अशी प्रार्थनाही शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलीय.


हेही वाचाः राज ठाकरेंचा ‘या’ नेत्याने शब्द पाळला, थेट अयोध्येत धडक

First Published on: June 5, 2022 12:29 PM
Exit mobile version